अहिल्यानगर | Ahilyanagar
येथील एमआयडीसी परिसरात घडलेल्या दोन खंडणी प्रकरणाने पुन्हा एकदा या औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीचे आणि त्यामागील राजकीय संगनमताचे पडसाद स्पष्ट केले आहेत. 7 ऑगस्ट रोजी एक्साईड इंडस्ट्रीज या नामांकित बॅटरी उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून आकाश बबन दंडवते व त्याच्या तीन साथीदारांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला. तसेच ‘डीएन इंजिनिअरिंग’ आणि ‘मनोहर इंजिनिअरिंग’ या कंपन्याचे मालक चिरंजीव दत्तात्रय गाढवे (रा. बोल्हेगाव) यांनी 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश गलांडे व दत्तात्रय तपकीरे (दोघे रा. बोल्हेगाव) यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार केवळ या दोन घटना नसून एमआयडीसीत चालणार्या अशा बेकायदेशीर रॅकेटचा एक नमुना आहे.
7 ऑगस्ट रोजी एक्साईड इंडस्ट्रीज या नामांकित बॅटरी उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून आकाश बबन दंडवते व त्याच्या तीन साथीदारांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या टोळीने 6 ऑगस्टला पुण्यावरून आलेल्या मालवाहू टेम्पोना गेट क्रमांक 3 वर अडवून चालकाकडे रोख रकमेची मागणी केली होती. दुसर्या दिवशी नाशिकहून आलेल्या वाहन चालकाला वाहन जाळण्याची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर एक्साईडचे पुरवठादार सॅमटेक आणि वेटझन यांच्या वाहनांनाही अडवून खंडणीची मागणी केल्याची माहिती कंपनीला ई-मेलव्दारे मिळाली. सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी पुढाकार घेऊन थेट गुन्हा दाखल केला आणि प्रकार उघडकीस आला. 9 ऑगस्ट रोजी चिरंजीव दत्तात्रय गाढवे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून योगेश गलांडे व दत्तात्रय तापकीरे (दोघे रा. बोल्हेगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला. आरोपानुसार, या दोघांनी दोन वर्षांपासून वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या बहाण्याने गाढवे यांच्याकडून तब्बल सहा लाख रूपये खंडणी वसूल केली होती.
राज्यातील औद्योगिक प्रगतीचे प्रतीक मानल्या जाणार्या एमआयडीसी क्षेत्राचा अहिल्यानगरचा विभाग मात्र दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत चालला आहे. केवळ दोन दिवसांत दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याने पुन्हा एकदा या औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या दहशतीचा आणि त्यामागील राजकीय संगनमताचा चेहरा उघड झाला आहे. अहिल्यानगर एमआयडीसीतील खंडणीखोरी ही केवळ गुन्हेगारी नसून, ती एक संगठित रॅकेट बनली आहे. कामगार आमच्याकडूनच घ्या, कच्चा माल आम्हीच पुरवू, स्क्रॅप आम्हीच उचलू या पध्दतीच्या दबावासोबत व्यापार्यांकडून थेट किंवा अप्रत्यक्ष खंडणी वसूल केली जाते. स्थानिक राजकीय नेत्यांचे पाठीशी घालणे हे या टोळ्यांना उघडपणे बळ देत आहे.
निवडणुकीच्या काळात औद्योगिक विकासाच्या घोषणा केल्या जातात, मात्र वास्तवात उद्योगपती दहशतीत आहे याकडे लक्ष दिले जात नाही. सुपा, रांजणगाव आणि छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीने मागील काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. मात्र, अहिल्यानगर एमआयडीसीला लागणारी राजकीय इच्छाशक्तीच दिसत नाही. मुलभूत सुविधा, उद्योगपयोगी पायाभूत सुविधा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भयमुक्त वातावरण या तिन्ही गोष्टी येथे कोलमडल्या आहेत. परिणामी गुंतवणूकदार मागे सरकत आहेत, तर स्थानिक उद्योगपती भीतीच्या छायेत व्यवसाय करीत आहेत. पोलिसांनी पुढाकार घेतल्याने खंडणीखोर दंडवते व गलांडे टोळीविरोधात गुन्हे दाखल झाले. तरीही, एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब आहे. याआधी अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी टोळीने या परिसरात दहशत माजवली होती.
एमआयडीसीतील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका आणि व्यावसायिकांचे सहकार्य दोन्ही आवश्यक आहे. मात्र व्यावसायिकांनी भीती न बाळगता तक्रार करण्याची मानसिकता तयार केली नाही, तर अशा टोळ्यांचे बळ वाढतच जाईल. स्थानिक राजकीय नेत्यांवर गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालण्याचे आरोप वारंवार झाले आहेत. निवडणुकीच्या काळात औद्योगिक विकासाच्या घोषणा केल्या जातात, मात्र राजकीय गुन्हेगारी साखळीला तोडल्याशिवाय अहिल्यानगर एमआयडीसीला खरी प्रगतीची गती मिळणार नाही.
व्यावसायिकांच्या भीतीचा ‘मूक’ परिणाम
एमआयडीसीचे सहायक निरीक्षक चौधरी यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर, त्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच खंडणीखोर टोळ्यांचे हे कारनामे उघडकीस आले. मात्र, अशा अनेक टोळ्या अजूनही सक्रिय आहेत. एमआयडीसी परिसरातील अनेक व्यापारी खंडणी, दादागिरी आणि बेकायदेशीर नियंत्रणामुळे त्रस्त असले तरी, राजकीय आश्रयामुळे तक्रार करण्याची हिंमत दाखवत नाहीत. या भीतीमुळेच टोळ्यांचे बळ वाढते आणि गुन्हेगारांना कारवाईची भीती राहत नाही. एमआयडीसीचा खुंटलेला विकास आणि गुन्हेगारीचे जाळे मोडण्यासाठी पोलिसांनी ‘मकोका’ सारख्या कडक कायद्यांचा वापर करून टोळ्यांचे नेटवर्क मोडणे, व्यावसायिकांनी एकजूट दाखवित भीती न बाळगता संगठित पध्दतीने तक्रार करणे आणि राजकीय इच्छाशक्ती गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या साखळीला मोडीत काढणे गरजेचे आहे.




