नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय हवाई दलाचा भक्कम कणा मानला जाणारा मिग 21 लढाऊ विमान तब्बल सहा दशकांच्या उत्कृष्ट सेवेनंतर आज (26 सप्टेंबर) सेवानिवृत्त होत आहे. कधी काळी आपल्या अपघातामुळे “उडत्या शव पेट्या” म्हणजेच “फ्लाईंग कॉफीन” असे नकारात्मक नाव पडलेले मिग 21 तज्ज्ञांच्या नजरेतून भारताचे एक उत्तम लढाऊ विमान होते. भारतीय हवाई दलाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एअर फोर्सकडून विशेष कार्यक्रमात या विमानाला अखेरचा निरोप देण्यात आला. शेवटची काही वर्षं या फायटर जेटसाठी कमालीची आव्हानात्मक राहिली असली, तरी त्याआधी भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये मिग-२१ नं मोलाची भूमिका बजावली आहे. यात १९६५ च्या युद्धापासून अगदी हल्लीच्या ऑपरेशन सिंदूरचादेखील समावेश आहे.
साधारण सहा दशकानंतर शुक्रवारी, 26 सप्टेंबर 2025 रोजी मिग 21 या लढाऊ विमानांची सेवा थांबवण्यात आली असून, २३ स्क्वाड्रन तुकडीच्या अखत्यारितील ‘पँथर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लढाऊ विमानांना शेवटचा निरोप देण्यासाठी चंडीगढ येथील हवाई दलाच्या तळावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मिग- 21 फायटर जेटने अतिशय दिमाखदार सोहळ्यात चंडिगढ एअरबेसवरून अखेरचे उड्डाण घेतले आणि तिथे असणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसह उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी या हवाई लढवैय्याला सलामी दिली. मिग 21 च्या निवृत्तीनंतर त्याची जागा तेजस LCA मार्क 1A घेणार आहे.
६२ वर्षांचा प्रदिर्घ प्रवास
१९६२ साली मिग-२१ विमाने भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. तेव्हापासून अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये ही विमाने भारतीय हवाई दलाच्या मोहिमांचा प्रमुख भाग राहिली आहेत. यात १९६५ व १९७१ ची भारत-पाकिस्तान युद्धं, १९९९ चे कारगिल युद्ध, २०१९ चा बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानच्या हद्दीत व पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेली हवाई मोहीम यांचा समावेश आहे.
मिग-21 ने अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. 1965 मध्ये भारत- पाक युद्धातही या लढवैय्याची महत्त्वाची भूमिका होती. यानंतर 1971 च्या युद्धातही हे विमान ‘गेम चेंजर’ ठरले. 1999 मध्ये ‘ऑपरेशन सफेद सागर’ दरम्यान कारगिलमध्ये याच विमानाची कर्तबगारी पाहायला मिळाली होती. त्यावेळी या लढाऊ विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकच्या वायुदलाचे अटलांटिक विमान हाणून पाडले होते.
दरम्यान, मिग-२१ लढाऊ विमानांमध्ये १९६० च्या दशकापासून आत्तापर्यंत अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. याआधीच ही विमाने निवृत्त केली जाणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याजागी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणारी भारतीय बनावटीची एलसीए तेजस एमकेवनए ही लढाऊ विमाने सज्ज होण्यास विलंब लागला. त्यामुळे पर्यायाने मिग-२१ विमानांची निवृत्तीही लांबत गेली. अखेर आता या प्रकारातील शेवटच्या मिग-बायसन श्रेणीतील लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त केले जाणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




