अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
किरकोळ वादाच्या (Dispute) कारणातून एका परप्रांतीय कामगाराने दुसर्या परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (Murder) केला. अशोककुमार अमरजित (रा. बसोली बु. बासगाव, जि. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. काटवन खंडोबा ते आगरकर मळ्याकडे जाणार्या रस्त्यावर चाहुराणा खुर्दमधील शेतात मंगळवारी (दि. 21) रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शेतकरी विश्वास रंगनाथ डांगे (वय 45 रा. ढोर गल्ली, माळीवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खून करणारा संशयित आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा (रा. बांकी, शेजवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विश्वकर्मा याला कोतवाली पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत अटक (Arrested) केली आहे. त्याला बुधवारी (दि. 22) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
विश्वास डांगे यांची चाहुराणा खुर्दमधील सर्व्हे नंबर 4/2 मध्ये शेत जमीन आहे. शेती कामासाठी अशोककुमार अमरजित, प्रमोद दीपचंद विश्वकर्मा यांना ठेवण्यात आले होते. ते त्याच ठिकाणी पत्र्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्यात मंगळवारी रात्री किरकोळ वाद झाले. या वादातून प्रमोदने अशोककुमारच्या डोक्यात दोन ते तीन वेळा दगड घालून त्याचा खून (Murder) केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
संशयित आरोपी विश्वकर्मा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपअधीक्षक भारती, निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अंमलदार सतीश भांड, दीपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिंदे, सुरज कदम, शाहिद शेख, अतुल काजळे, प्रमोद लहारे, अमोल गाडे, राहुल गुड्डू यांच्या पथकाने विश्वकर्मा याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अधिक तपास निरीक्षक दराडे करत आहेत.