नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात झालेल्या एका रस्ते अपघातात दहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. हा अपघात भदरवाह-चंबा रस्त्यावर खन्नी टॉपजवळ झाला.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, १७ सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन जवळच्या चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. घटनास्थळावरून दहा सैनिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सात सैनिकांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातून जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. जखमी सैनिकांना घटनास्थळी तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी उधमपूर येथे विमानाने हलवण्यात आले. जखमींपैकी किमान तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास सुरू अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, रस्त्याची अवस्था आणि हवामान यासह सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




