श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दूध भेसळीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर दुधामध्ये भेसळ करण्यात येत आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी काही स्वार्थी लोक रासायनिक पदार्थ आणि इतर अशुद्ध घटक दुधामध्ये मिसळत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी दूध भेसळ प्रकरणी अॅक्शन मोडवर येण्याची गरज आहे.
दूध भेसळ ही फक्त आर्थिक फसवणूक नसून, ती लोकांच्या जीवनाशी संबंधित एक गंभीर मुद्दा बनला आहे. सध्या लोकांना मिळणारे दूध हे अनेक वेळा शुद्ध असत नाही. शेतकर्यांच्या कष्टाची कदर न करता, भेसळ करणारे काही लोक याला आपल्या नफ्याचे साधन बनवत आहेत. यामुळे दूध विकत घेत असलेले नागरिक, विशेषत: लहान मुले आणि वृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दूध भेसळ करणार्यांमुळे शेतकर्यांचेही नुकसान होत आहे. भेसळ बंद झाल्यास शेतकरी किमान 50-70 रुपये प्रति लिटर भाव मिळवू शकतो, परंतु भेसळ करणार्यांमुळे त्यांचे कष्ट आणि मेहनत फोल जात आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक स्तर सुधारण्यास अडचण निर्माण झाली आहे. दूध भेसळीला रोखण्यासाठी नागरिकांनी एकजूट होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शेतकर्याच्या आणि नागरिकाच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल. दूध भेसळ करणार्यांना शिक्षा करूनच शुद्ध दूध मिळवता येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी तसेच दूध उत्पादक शेतकर्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
दूध भेसळीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी
जे लोक दूध भेसळ करुन सामान्य नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत आहेत, त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु शासन याबाबत उदासीन आहे. शासनाच्या अशा धोरणामुळेच दूध भेसळ करणारे सोकले आहेत. महिन्यातून एकदा दूध प्लँटची तपासणी होणे गरजेचे असून जो प्लँट चालक दोषी आढळेल त्याच्याविरुध्द कठोर कारवाई केली पाहीजे, तेच दूध त्याला प्यायला दिले पाहीजे.




