अकोले |प्रतिनिधी| Akole
राज्यात 1 ऑक्टोबरपासून शेतकर्यांच्या दुधाला 35 रुपये लिटर दर मिळणार आहे. त्यासाठी लिटर मागे 7 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे आठवडाभरात संबंधितांच्या खात्यावर वर्ग होतील असेही त्यांनी जाहीर केले. अकोले तालुक्यातील सर्व गाव, वाड्या-वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
अकोले शहरात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे आगमन झाले. त्यानिमित्ताने बाजारतळावर जाहीर सभा झाली. याप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी पंकज गोसावी आदी उपस्थित होते.
आदिवासी बांधव लोक परंपरा, संस्कृतीचे जतन करतात. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात. निळवंडे धरणात नौकाविहार सारखी जलपर्यटन सुविधा देण्याचे काम भविष्यात शासन करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त उंचखडक बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा तीन लक्ष रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.