अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ आतापर्यंत नगर जिल्ह्यातील 90 हजार 566 हजार दूध उत्पादक शेतकर्यांना झाला असून, या अनुदानापोटी 76 कोटी 8 लाख 56 हजार 795 कोटी रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारच्या सुचनेनुसार कमी कमीत वेळेत पूशपालकांसह जनावरांचे टॅगिंग आणि अन्य ऑनलाईन माहिती संकलित केल्याने ऐवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान देत येणे शक्य झाले आहे.
राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी महसूल तथा पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी 5 रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. त्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण करणे, अनुदान देण्यासाठी शेतकर्यांचे रेकॉर्ड तयार करणे, शेतकर्यांसह जनावरांची माहिती, दुधाचे उत्पादन याची माहिती ऑनलाईन करण्यात काही कालावधी गेला. मात्र, पशूसंवर्धनाने आतापर्यंत जिल्ह्यातील 90 हजारांहून अधिक
शेतकर्यांना दुधाचे अनुदान देण्यात यश मिळवले आहे. या योजनेत दूध उत्पादक शेतकर्यांना 11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेत सर्वाधिक लाभ हा संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना देण्यात आला असून तालुक्यातील 23 हजार 304, राहुरी 12 हजार 60 आणि राहाता 10 हजार 853 शेतकर्यांना दुधाचे अनुदान मंजूर झालेले आहे. तालुकानिहाय आकडेवारीत अकोले तालुक्यातील 5 हजार 820 शेतकर्यांना 3 कोटी 68 लाख 10 हजार 175, संगमनेर तालुक्यातील 23 हजार 304 शेतकर्यांना 16 कोटी 15 लाख 77 हजार 255, कोपरगाव तालुक्यातील 7 हजार 950 शेतकर्यांना 5 कोटी 13 लाख 95 हजार 920, राहाता तालुक्यातील 10 हजार 853 शेतकर्यांना 7 कोटी 88 लाख 66 हजार 35, श्रीरामपूर तालुक्यातील 5 हजार 121 शेतकर्यांना 3 कोटी 78 लाख 59 हजार 155, नगर तालुक्यातील 4 हजार 177 शेतकर्यांना 3 कोटी 3 लाख 89 हजार 725, नेवासा तालुक्यातील 3 हजार 399 शेतकर्यांना 3 कोटी 51 लाख 67 हजार 405, पारनेरमध्ये 5 हजार 967 शेतकर्यांना 6 कोटी 28 लाख 36 हजार 445, पाथर्डी तालुक्यातील 2 हजार 381 शेतकर्यांना 2 कोटी 59 लाख 70 हजार 265, राहुरी तालुक्यातील 12 हजार 60 शेतकर्यांना 11 कोटी 80 लाख 40 हजार 90 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 3 हजार 151 शेतकर्यांना 3 कोटी 85 लाख 56 हजार 270, शेवगाव 426 शेतकर्यांना 46 लाख 43 हजार 435, जामखेडमधील 1 हजार 533 शेतकर्यांना 2 कोटी 78 लाख 4 हजार 700 आणि कर्जत 4 हजार 460 शेतकर्यांना 5 कोटी 79 लाख 59 हजार 920 एवढे अनुदान प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्ह्यातील दूध संघाना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतकर्यांची माहिती विभागाने संकलित केली असून हे दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नयेत म्हणून, त्यांनाही अनुदनाचा लाभ देण्यात येत आहे. अनुदानापासून शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी पूशसंवर्धन विभागासह राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
अनुदानासाठी रेट कमी करण्याचा खेळ?
राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांना दिसाला देण्यासाठी, त्यांची आर्थिक घडी बसवण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, अनुदानाच्या मलिद्यासाठी राज्यात काही संघाकडून जाणीवपूर्वक शेतकर्यांच्या दूधाचे भाव कमी करण्यासाठी लॉबिंग करण्यात येत असल्याची चर्चा आहे. यामुळे राज्य सरकारने यावर लक्ष ठेवून संबंधीतांना वेळीच रोखण्याची वेळ आली आहे.
शेतकर्यांची माहिती संकलन सुरू
जिल्ह्यात दक्षिणेतील विशेष करून कर्जत आणि जामखेडसह अन्य तालुक्यातील सुमारे 25 ते 30 हजार शेतकर्यांची माहिती संकलित होण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना देखील लवकरच अनुदान अदा करण्यात येणार असल्याचे दुग्ध विकास आणि पशूसवंर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. यासह राज्य शेतकर्यांना आणखी दिलासा देण्यासाठी योजनेला मुदत वाढण्याच्या तयारीत आहे.