अकोले |प्रतिनिधी| Akole
दुधाला 40 रुपये प्रतिलिटर दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोतूळ येथे 14 दिवस शेतकरी बेमुदत धरणे आंदोलनावर बसले असून हे धरणे आंदोलन अद्यापही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे, अशी विनंती करणारे निवेदन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने व कोतूळ येथील सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून खासदार शरद पवार यांना देण्यात आले.
अकोले येथे स्व. अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी अकोल्यात खासदार पवार आले असताना मेळाव्याच्या मंचावर जाऊन शेतकर्यांनी हे निवेदन दिले. दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे हे देखील मेळाव्यासाठी उपस्थित होते. शेतकर्यांच्या प्रश्नांवर मांडणी करत असताना दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सखोल विश्लेषण केले.
दूध प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनास कुणाचा पाठिंबा आहे त्यांनी हात वर करावा असे आवाहन त्यांनी सभेस केले त्यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असणार्या शेतकर्यांनी हात उंचावून या आंदोलनास पाठिंबा दिला. मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, नीलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी व उपस्थित शेतकरी कार्यकर्त्यांनी आंदोलनास हात उंच करून पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, 22 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दूध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही डॉ. अशोक ढवळे यांनी जाहीर केले.
सर्वच पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दूध उत्पादकांच्या मागे उभे राहावे, कोतूळ येथे 14 दिवस सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देत राज्यभर दूध आंदोलनाचा विस्तार करावा, असे आवाहनही आम्ही करत आहोत.
– डॉ. अजित नवले (राज्य समन्वयक-दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती)