Saturday, July 27, 2024
Homeनगरपडलेले दर दूध व्यवसाय मोडकळीस कारणीभूत

पडलेले दर दूध व्यवसाय मोडकळीस कारणीभूत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेतीला पुरक व्यावसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची ओळख आहे. दुधातून कुटुंबाचे आर्थिक चक्र चालते, तर उपलब्ध शेणामधून शेतीला खत मिळते. म्हणून अनेक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. परंतु गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून दुधाच्या दरामध्ये सतत घसरण झाल्याने शेतीला पुरक असलेला दुग्ध व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक तरुण तर हा व्यवसाय सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतरीत झाल्याचे भयावह चित्र आहे. निवडणुकीमध्ये मशगूल असलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या भावनांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांतून होत आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील शेती व्यवसायाशी पूरक असणारा दुग्ध व्यवसाय दुधाला भाव नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडून तो अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकर्‍याला आपले पशुधन येईल त्या किंमतीला विकावे लागत आहे. गोठेच्या गोठे रिकामे झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून शाश्वत असा दुग्ध व्यवसाय आहे. मोठा तरुणवर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळला असून अनेक तरुण दूध उत्पादक शेतकर्‍यांनी बँकांचे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. परंतु दुधाला कवडीमोल दर मिळत असल्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने 3.5 फॅट व 8.5 एस एन एफ ला 40 रुपये दर करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे.

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने दुधाचे दर 3.5 फॅट व 8.5 एस एन एफ ला 28 रुपये निघत आहे. त्यामुळे ‘घर जाळून कोळशाचा व्यवसाय’ दूध उत्पादक शेतकर्‍याला करावा लागत आहे. मिळणार्‍या भावातून चारा, खाद्य, अंगमेहनत या सर्वांचा विचार केला तर हातामध्ये शेण सुध्दा शिल्लक राहत नाही. एवढी भयानक अवस्था शेतकर्‍याची झाली आहे. दूध उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

सध्या खाद्याचे भाव सरकी पेंड 1 हजार 570 रुपये, कांडी 1 हजार 710 रुपये, वालीस 1 हजार 450 रुपये, मका भरडा 1 हजार 350 रुपये, हिरवा चारा ऊस एका टनाचे 3 हजार 500 रुपये, हिरवी मका 2 हजार 500 रुपये टन असा भाव असल्याने सध्याच्या दूध दराचा व खर्चाचा विचार केला तर शेतकर्‍यांच्या हातात काहीच राहत नाही. पशुखाद्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि दुधाच्या दरामध्ये कपात सुरूच आहे. मागील वर्षी दुधाचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, राज्यातील खासगी दूध संघाने दूध दर पाडण्यास सुरुवात केली. त्यासाठी शासनाने खासगी दूध संघावरही नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

याबाबत शासनाने दुधाचे दर ठरविण्यासाठी राज्य दूध दर नियंत्रण समितीची स्थापना केली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उसाप्रमाणे दुधाचीही एफआरपी ठरवून हमीभाव देणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकर्‍यांना पदरमोड करूनच आपल्याकडील पशुधन सांभाळण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने व उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने चार्‍याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दुधाचे दर कमी असल्याने गायींच्या किमतीमध्येही मोठी घसरण होऊन दूध उत्पादक शेतकर्‍यांना आपली जनावरे कवडीमोल भावात विकावी लागत आहेत. त्यामुळे शासनाने दूध दरासाठी गांभीर्याने विचार करून दुधाच्या दरामध्ये भरीव वाढ करणे गरजेचे आहे. दुधाच्या दरामध्ये वाढ झाली तरच ग्रामीण भागातील शाश्वत असा भरवशाचा शेतीपूरक दुग्ध व्यवसाय टिकेल अन्यथा दूध उत्पादक शेतकरी अजून आर्थिक अडचणीत येऊन संकटात सापडतील.

दुधातील भेसळ थांबविण्याची गरज
राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ सुरू आहे. दूध भेसळीमुळे काबाडकष्ट करून दूध व्यवसाय करणार्‍या प्रामाणिक दूध उत्पादकांच्या दुधाला कवडीमोल दर मिळत आहे. दुधाचे दर वाढण्यास सुरुवात झाली की, लगेचच दुधाचे दर पुन्हा कमी होण्यास सुरुवात होते. दुधातील भेसळ रोखण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. शंभर टक्के दूध भेसळ बंद झाली तरच काबाडकष्ट करुन दूध घालणार्‍या शेतकर्‍यांच्या दुधाला समाधानकारक दर मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या