कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत- श्रीगोंदा रोडवरील हिरडगाव लोहकारा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाजवळ गुरूवारी सकाळी मोठा अपघात घडला. लग्नावरून परतणारे वर्हाड घेऊन जाणारी गाडी बायपास पुलावरून घसरत थेट पाण्यात पलटी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ थोडक्यात टळला.
ही गाडी घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथील लग्न समारंभावरून कर्जत मार्गे परतत होती. गाडीत 25 महिला, 2 पुरुष आणि 1 लहान मुलगी प्रवास करत होते. पुलावर तात्पुरत्या बायपासचा रस्ता तयार करण्यात आला असून त्यावर प्रकाश व्यवस्था, सूचना फलक किंवा सुरक्षित रेलिंगचा अभाव असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांचा संताप व्यक्त होत असून, लोहकारा पुलाचे बांधकाम अक्षम्य दिरंगाईने सुरू असल्याने प्रवाशांना जीवघेण्या परिस्थितीला वारंवार सामोरं जावं लागत आहे. बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.




