नाशिक | Nashik
विद्यार्थ्यामध्ये कौशल्य, नम्रता, प्रामाणिकपणा केवळ शिक्षकच निर्माण करु शकतात. त्यामुळे गुरुंना आता निवृत्त होता येणार नाही. जगाची हुशार आणि होतकरु तरुणांची गरज भागवण्यासाठी आता जर्मनीसुद्धा भारतीय तरुणांकडे आशेने पाहत आहे. ती अपेक्षा गुरुंशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी केले.
नाशिक महानगर आणि जिल्ह्यात सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षक, शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्थांच्या सेवाकार्याचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज दैनिक ‘देशदूत’चा ‘गुरू सन्मान’ पुरस्कार (Guru Samman Award) सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नीती आयोग शिक्षण उपसमिती सदस्य महेश दाबक, जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. साहेबराव बागल यांच्यासह देशदूत वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यस्थापक अमोल घावरे उपस्थित होते.
हे देखील वाचा : संपादकीय : ६ ऑगस्ट २०२४ – कौशल्य विकासाची वाट
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुजनांचे समाजातील योगदान आणि महत्व विशद केले. एक गुरु हजारो लोकांना जीवनाची दिशा देत असतो. त्यामुळे आजच्या काळात आदर्श शिक्षकांना कदापी निवृत्त होता येणार नाही. कारण सारे जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. जर्मनीने भारताकडे चार लाख शिक्षित तरुणांची मागणी केली आहे. त्यातील चाळीस हजाराची पहिली तुकडी नुकतीच रवाना होत आहे. जगभरातील नामांकित कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर आज भारतीय वंशाचे लोक आहेत. कौशल्य व प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भविष्यात जगाची गरज भागवण्यासाठी शिक्षकांशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
गुरुदक्षिणा कॅम्पसच्या पलाश हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार (Exemplary Teacher Award) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याने शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना पुरस्कार्थीमध्ये दिसून आली. या मिळालेल्या पुरस्कारामुळे मनोबल वाढून अध्यापन कार्याला स्फूर्ती मिळाल्याची भावना पुरस्कारार्थी शिक्षकांनी व्यक्त केली. डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर विक्रम सारडा यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. अमोल घावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रायोजक कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब होते.
‘देशदूत’ बद्दल कृतज्ञता
उमेदीच्या काळात दैनिक ‘देशदूत’ने दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल पाटील यांनी ‘देशदूत’ बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रामाणिक व निर्भीडपणे लिहून समाजातील निरपेक्ष वर्तमानपत्राची योग्य भूमिका पार पाडणाऱ्या मोजक्या वर्तमानपत्रात ‘देशदूत’ ने आपला लौकिक जोपासला आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.
चांगल्या शिक्षकांना पर्याय नसेल – दाबक
यावेळी महेश दाबक म्हणाले की, उच्च शिक्षणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे सारे श्रेय त्यांनी मंत्री चंद्रकात पाटील यांच्या दूरदृष्टीला दिले. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांना अद्ययावत राहावे लागेल याची जाणीव दाबक यांनी करुन दिली. प्रत्यक्षात शिक्षक २० शतकातील असून विद्यार्थी २१ व्या शतकातील असतील. त्यांच्या गरजा, अपेक्षा वेगळ्या असतील. त्यासाठी शिक्षकांना देखील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे लागणार आहे. डिजिटल युगात शिक्षणाचे विविध पर्याय निर्माण होणार असल्याने चांगल्या शिक्षकांना पर्याय नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जीवन सन्मान पुरस्कार
सरोज गरूड, सुधाकर खांबेकर, मेजर सपना शर्मा, मोहम्मद जमीर पठाण, चित्रकार राजेश सावंत.
गुरू सन्मान पुरस्कार
प्रा. मोतीराम देशमुख, प्रा. बाबुलाल सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर भालेराव, प्रा. सुदाम सूर्यवंशी, प्रा. डॉ. घनशाम जाधव, प्रा. राम खैरनार, प्रा. भालचंद्र पाटील, प्रा. गुलाब देवरे, प्रा. गणेश धुमाळ, प्रा. राजेंद्र धनवटे, प्रा. संदीप घायाळ, अशोक आबा सोनजे, (उन्नती एज्युकेशन सोसायटी, नाशिक), संजय गुंजाळ, (पुणे विद्यार्थी गृह, नाशिक), दिलीप बिन्नर, (सरस्वती सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सेवाभावी संस्था, सिन्नर), मनीषा खडके, (स्मॉल स्टेप्स एलिमेंटरी अँड किंडरगार्टन, नाशिक), राजेश गडाख, (माध्यमिक लोकशिक्षण मंडळ), गंगाधर उर्फ गं. पां. माने, (जनता सेवा मंडळ), राहुल रामचंद्रन, (नाशिक केंब्रिज स्कूल), रोहिणी नायडू, (न्यू ग्रेस अकॅडमी, नाशिक), रिमा अहिरे, (माउंट लिटरा झी स्कूल, आडगाव, नाशिक), संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था, वसंतनगर, जातेगाव, ता. नांदगाव
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा