मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच आज खासदार सुप्रीया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लावण्यात आला आहे.मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रकरणी आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
एनडीएचे पार्टनर वाढत असतील तर भाजपसाठी चांगलं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणीसांची भेट घेतली आहे आणि दोघांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली. याबाबत प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एनडीएचे पार्टनर वाढत असतील तर भाजपसाठी चांगलं आहे. जास्तीत जास्त लोक एनडीएमध्ये येणं आणि एनडीए मजबूत होणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. एकंदरीत ही सकारात्मक गोष्ट आहे. एनडीएमध्ये जास्तीत जास्त पार्टनर असले पाहिजेत. पुढच्या विकासासाठी, विकसित देशाकरीता जास्तीत जास्त लोकांचा सहभाग महत्वाचा आहे, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
डिलिमिटेशनला पाठिंबा देणं हेच खऱ्या अर्थाने या देशाकरता निवडणुकीत महत्वाचं
डिलिमिटेशनला सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा आहे, पण काँग्रेसचा विरोध आहे. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त झाले आहेत. “डिलिमिटेशनला पाठिंबा देणं हेच खऱ्या अर्थाने या देशाकरता निवडणुकीत महत्वाचं आहे. कारण एक-एक मतदारसंघ बघा. रामटेक लोकसभा मतदारसंघ बघा, सहाविधानसभा मतदारसंघ त्यात येतात. इतक्या मोठ्या मतदारसंघात काम करणं खासदारासाठी सुद्धा कठीण आहे. विधानसभेचा विचार केला, तर कामठी विधानसभेत 5.50 लाख मतं येतात. एक आमदार इतका मोठा मतदारसंघ कसा काय कव्हर करु शकतो” असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.
आमच्या बहिणींसाठी 33 टक्के आरक्षण महत्वाचं आहे
“जेवढे छोटे मतदारसंघ तेवढा विकास चांगला, जेवढा छोटा मतदारसंघ तेवढा संपर्क चांगला. जास्तीत जास्त लक्ष. लोकप्रतिनिधी विकासासाठी महत्वाचे असतात. जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी सरकारमध्ये असण्याचा एक मोठा फायदा सरकारी योजना पोहोचवण्यासाठी होतो. डिलिमिटेशनचा जो कायदा आहे, तो मान्य करणं महत्वाचं आहे. लोकसभेला, विधानसभेला डिलिमिटेशन होणं महत्वाचं आहे. आमच्या बहिणींसाठी 33 टक्के आरक्षण महत्वाचं आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इंडिया आघाडीमधला काँग्रेस विजनलेस आहे
शरद पवार गटातले सत्तेसाठी हपापलेले लोक सत्तेसोबत जात आहेत, अशी टीका काँग्रेसने केलीय. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस पार्टी किंचित, किंचित होत चाललीय. इंडिया आघाडीला आपले पार्टनर संभाळता येत नाहीयत. इंडिया आघाडीमधला जो मुख्य पक्ष आहे काँग्रेस, तो विजनलेस आहे, त्यांचं नेतृत्व विजनलेस आहे”




