Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमंत्री छगन भुजबळ यांचा रुग्णालयातून येवलेकरांशी ऑनलाईन संवाद, 'जेवढे प्रेम तुम्ही मला...

मंत्री छगन भुजबळ यांचा रुग्णालयातून येवलेकरांशी ऑनलाईन संवाद, ‘जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच महायुतीच्या…

येवला । प्रतिनिधी Yeola

येवलेकरांना केवळ विकास हवा आहे, हाच आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच येवला नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल’, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मुंबईत हॉस्पिटलमध्ये सलाईन घेत असतानाही मंत्री भुजबळ यांनी महायुतीच्या प्रचार सभेत येवलेकरांशी ऑनलाईन संवाद साधला. मंत्री भुजबळ यांना येवल्याविषयी तळमळ असल्याची जनभावना प्रचार सभेत दिसत होती. दरम्यान, ‘येवल्यात आम्ही कुणाच्याही जमिनी, बँका लुबाडल्या नाही किंवा पैसेही बुडवले नाहीत’, असा टोलाही त्यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.

YouTube video player

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाइं (आठवले) मित्र पक्ष घटक पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी व २६ नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज, रविवारी, (दि. ३०) येवला शहरातील शनी पटांगणावर जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मंत्री भुजबळ यांनी दृकश्राव्य माध्यमातून येवलेकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

‘आजवर कोट्यावधी रुपयांची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली. त्यामुळे येवलेकरांनी मला पाच वेळा सातत्याने निवडून दिले. आपण येवल्यात अनेक विकासकामे केली आहेत. मांजरपाडा सारखे अत्यंत कठीण काम आपण पूर्ण केले आहे. राज्यातील हा पथदर्शी असा पहिलाच प्रयत्न असून तो यशस्वी झाला आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. आपण येसगाववरुन येवला शहरासाठी पाणी आणत आहोत. हे पाणी येऊ नये यासाठी काही मंडळीनी राजकारण केले, त्यात खोडा घातला. पण हा प्रश्न आपण सोडविला आहे. पुढील काही महिन्यातच शहराच्या सर्व भागात दररोज आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात होईल’, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

कोपरगाव येवला मनमाड चौपदरी कॉंक्रीटरोड सह येवला बायपास रस्ता आपण करीत आहोत. विस्थापित गाळेधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने लातूर पॅटर्नच्या धर्तीवर आपण लवकरच सोडविणार आहोत. आगामी काळात आपण येवला शहरामध्ये जी विकासकामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्या पसंतीला उतरल्याचे मला कळाले आहे. राजाभाऊ लोणारी यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी कराल. मी जरी येवल्यात नसलो तरी समीर आणि पंकज हे तुमच्या सेवेसाठी येवल्यात आहेत. जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच प्रेम हे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल’, अशी मला खात्री असल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळ यांनी, सर्वात शेवटी शेर म्हणून भाषणाची सांगता केली. तो असा, “संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है| सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया,तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया||”

येवला शहरातील विस्तापित गाळे धारकांना न्याय मिळावा यासाठी लातूरच्या धर्तीवर विस्थापित व्यावसायीकांना न्याय दिला जाणार आहे. खरतर माजी मुख्यमंत्री येवल्यात येऊन गेले. त्यांच्या कडे नगरविकास खाते असल्याने हा प्रश्न त्यांनी अगोदरच मार्गी लावायला हवा होता असे, माजी खासदार समीर भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले. आज आपल्यावर जे टीका करत आहे. त्यांनी येवल्यातील अनेक बँका आणि पतसंस्था संपविल्या. येवला मर्चंट बँकेला अडचणीत आणल. हे लोक जिथे गेले ती संस्था डूबवतात. जिल्हा बँकेमध्ये गेले जिल्हा बँक बुडाली. २० वर्षांपूर्वी साखर कारखान्याच्या नावाने शेअर्स जमा केले. त्यातून जमीनी घेतल्या, शाळा काढल्या. ज्यांनी पैसे परत मागीतले त्यांना दमदाटी केली अशी टीकाही त्यांनी केली. तर या निवडणुकीत काही प्रभागात गुंडगिरी आणि दमदाटी करण्याचा प्रकार केला जाईल. त्यांना सांगायचे आहे की, माझ्या कार्यकर्त्यांवर कुणीही दमदाटी करण्याचा प्रयत्न जरी केला. तरी याद राखा गाठ माझ्याशी आहे असा इशाराही समीर भुजबळ यांनी विरोधकांना दिला.

आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, येवलेकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना येवल्यात आणले. त्यानंतर गेल्या वीस वर्षात आज, येवल्यात अनेक महत्वाची विकास कामे झाल्याने येवल्याचे रूप बदलले आहे. येवला आज भुजबळ साहेबांचा परिवार आहे. त्यांची उणीव भासू नये म्हणून सर्व कुटुंबाला आपल्याकडे पाठविले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार मारोतीराव पवार, भाजपचे लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, बाळासाहेब कर्डक, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, वंसत पवार, धनंजय कुलकर्णी, प्रमोद सस्कर, प्रा. नागेश गवळी, राजेश भांडगे, अशोक संकलेचा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांनी केले. सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, संभाजी पवार, अरुण थोरात, डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व येवलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...