मुंबई | Mumbai
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर गेल्या दीड महिन्यांपासून बीडचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर कराड यांच्यावर या हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आला असून ते त्यांना २२ जानेवारीपर्यंत एसआयटीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट भाष्य केले करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. ते शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना मुंडे म्हणाले की, “माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहे, प्रत्येक गोष्ट व आरोप खोटी आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप (Allegations) त्यांनी (विरोधकांनी) खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर बोलायचं नाही. सध्या मी त्यावर काही बोलणार नाही. जेव्हा मला त्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही हे तुम्ही सगळेजण जाणता. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातील (Beed District) नागरिकाला, या मातीतील माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “माझी विरोधकांना एवढीच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना मला बदनाम करायचं असेल तर करावं. आणखी कोणाला बदनाम करायचं असेल तर त्याला देखील बदनाम करा. परंतु, कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, या मातीला बदनाम करू नका. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या वैद्यनाथ नगरीला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका एवढीच माझी विनंती आहे”, असे मुंडेंनी म्हटले. तसेच बीडच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवारांना जबाबदारी देण्यासाठी मीच मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाला सांगितले होते”, असेही त्यांनी स्पष्ट केले.