Tuesday, September 17, 2024
Homeनगरश्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला कॅबिनेटमध्ये मीच वाचा फोडणार

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला कॅबिनेटमध्ये मीच वाचा फोडणार

मंत्री महाजन यांची ग्वाही

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन खरं तर अगोदरच व्हायला पाहिजे होते. या बहुप्रलंबीत जिल्हा विभाजन आणि श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला कॅबिनेटच्या बैठकीत मांडून मीच वाचा फोडतो, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी येथे एका आयोजित कार्यक्रमात दिली. ना. महाजन म्हणाले, नगर जिल्ह्याचे विभाजन ही काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल. खरंतर हे विभाजन अगोदरच व्हायला पाहिजे होते. विभाजनाचा प्रस्ताव अनेकदा कॅबिनेट पुढे आला. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा विषय कायम प्रसार माध्यमात चर्चेत असतो.

आजही अनेकांनी हा विषय तीव्रतेने मांडला. त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन आणि श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा विषय मीच कॅबिनेटच्या बैठकीत मांडून या प्रश्नाला वाचा फोडतो. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर येथे आहेतच. परंतु गरज पडल्यास श्रीरामपूरकरांनो, येथील प्रश्न घेऊन येत जा. आपण ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही मंत्री महाजन यांनी दिली. या कार्यक्रमात सर्वश्री माजी खा. सदाशिव लोखंडे, भाजप प्रदेश ओबीसीचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी यावेळी श्रीरामपूरच्या विकासासाठी एमआयडीसीत उद्योग धंद्याची वाढ करून रोजगार निर्माण करणे, पूर्ण गुणवत्ता असुनही रखडलेला प्रस्तावित श्रीरामपूर जिल्हा निर्माण करणे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे पूनरूज्जिवन करणे आदी प्रश्न मांडले.तर माजी आ. चंद्रशेखर कदम, देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनीही जिल्हा प्रश्नी दुजोरा दिला. तसेच श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री महाजन यांचे व्यक्तिगत भेटुन निवेदन देत लक्ष वेधले असता त्यावर त्यांनी भाष्य केले. यावेळी आ. राम शिंदे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते.

मंत्री महाजन पुढे म्हणाले की, गत निवडणुकीत विरोधकांनी खोट्या अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे सरकारला भरीव कामगिरी करुनही अनपेक्षित यश मिळाले. जर केंद्रात चारशे पारचे लक्ष पार केले असते तर चित्र वेगळे दिसले असते. सारे जग मोदींचा आदर सन्मान करते आणि आपण खोट्या अफवांना बळी पडलोत.देशाला नरेंद्र मोदींचे नेतृत्व, केंद्रात भाजप – एनडीए व राज्यात महायुतीची सत्ता असणे ही देशाची गरज आहे. देशात आणि राज्यात तीर्थक्षेत्रांच्या विकासाला सरकार नेहमीच कटिबध्द आहे. आपण स्वतः लक्ष घालुन सराला बेट देवस्थानच्या विकासाला हातभार लावला.आता नजीकच्या काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विकास होणार आहे.हिंदु म्हणून आपण एकत्र का येत नाही? असा सवाल करीत त्यांनी त्यासाठी बांगला देशाचे ताजे उदाहरण दिले. त्यांनी पुढे सांगितले की, आपले मत आणि आदर्श आपणच ठरवण्याची वेळ आली आहे. जर आपण जातीपातीत अडकलो तर मात्र भविष्य काळ कठीण आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या त्याग आणि समर्पण यातून पक्ष संघटना ऊभी राहते आणि वाढते. काम करताना प्रामाणिकपणा व विश्वास संपादन केला तर जात, पात, पैसा काहीच काम करीत नाही हा माझा स्वानुभव आहे.

उध्दव ठाकरेंचा पुढील काळ वाईट
गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप- सेना युतीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट कौल दिला होता. मात्र उध्दव ठाकरेंना दुर्बुद्धी सुचली अन ते विचारांपासून दुर जात त्यांनी थेट बाळासाहेबांच्याच विचारांना तिलांजली दिली. आज त्यांना बरं वाटत असेल पण त्यांचा पुढचा काळ फार कठीण आहे, सूचक इशाराही मंत्री महाजन यांनी ठाकरेंना दिला.

जिल्हाप्रश्नी श्रीरामपूरकरांच्या आशा उंचावल्या
1995 पासून सतत चर्चेत असलेल्या प्रस्तावित श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला पूर्ण गुणवत्ता आणि प्रशासकीय शिफारशी असुनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि श्रेयवादात हा प्रश्न आजवर प्रलंबित राहिला आहे. त्यावर सतत अनेक संघटनांची आंदोलने सुरुच आहेत. मात्र आणखी नावे पुढे करुन सर्वांगीण निकष पूर्ण करणार्‍या श्रीरामपूरला सोयीस्करपणे डावलले गेले आहे. आता या प्रश्नी राज्यातील ज्येष्ठमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेण्याचे जाहीर संकेत दिले. त्यामुळे वर्षांनुवर्षे लढा देणार्‍या श्रीरामपूरकरांच्या आशा उंचावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या