पुणे | Pune
पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या १४ दिवसांपासून सुरू आहे. काही विद्यार्थी आमरण उपोषणावर असून, सरकारकडून मागण्यांबाबत ठोस आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी गेलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी झिरवळ यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी मागण्यांवर सरकारकडून लेखी जीआर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. दरम्यान, झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
झिरवळ नेमकं काय म्हणाले?
यावेळी नरहरी झिरवळ यांनी खाऊन पिऊन आंदोलन करा, मी देखील चोरून खायचो आणि आंदोलन करायचो, असा अजब सल्ला दिला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना असा सल्ला देऊन नरहरी झिळवळांनी या आंदोलनाची मस्करी केली आहे अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, आपल्या विविध 14 मागण्यांसाठी पुण्याच्या मांजरी परिसरात गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
संपादकीय : २७ ऑगस्ट २०२६ – खासगी शिकवणी वर्गांना शिस्त लागेल?
विद्यार्थ्यांचे झिरवाळांना प्रत्युत्तर
झिरवळ यांच्या वक्तव्यावर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनीही तात्काळ प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला खाऊन-पिऊन आंदोलन करायचे असते तर तुम्ही इथे आलेच नसते,’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. उपोषण आणि आंदोलनामागे मागण्या मान्य करून घेण्याचा गंभीर उद्देश असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंत्री आणि आंदोलनकर्त्यांमधील संवादादरम्यान काही वेळ वातावरण तापल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांसोबत ५ तास चर्चा
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घ बैठक घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उपोषणावर कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. मंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत. दरम्यान, 14 दिवसांच्या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे. आदिवासी विभागाचा मंत्री आणि एक पालक म्हणून मी विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली आहे. आमची पोरं-पोरी आपल्या हक्कासाठी बोलू लागली आहेत, याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आमचे कोणतेही अडले नाही. काही तांत्रिक बाबींवर विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबरोबर अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी चर्चा केली.




