मुंबई | Mumbai
भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नला अवघे १० महिने झाले असतानाच हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करीत असून घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेंच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी शनिवारी आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या कौटुंबिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. वरळी बीडीडी चाळ येथे गौरी रहात होत्या, त्या केईएम रुग्णालय डेंटिस विभागात कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतरच हत्या आहे की आत्महत्या, हे स्पष्ट होईल. अनंत गर्जे यांचे काही महिन्यापूर्वीच थाटात लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मोठ्या थाटात झाला होता लग्नसोहळा
पंकजा मुंडेंचे स्वीय सहायक्क अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला देखील पंकजा मुंडे आपली बहीण प्रीतम मुंडेंसह गेल्या होत्या, मोठ्या थाटामाटात ७ फेब्रुवारीला लग्न झाले होते. अवघ्या दहा महिन्यांत त्यांच्या संसारात नेमके काय घडले, त्यांनी असे टोकाचा निर्णय का घेतला? याची सध्या चर्चा सुरू आहे.
अनंत गर्जेंचे बाहेर प्रेमसंबंधाचा गौरीला संशय
आपल्या पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत गौरीने व्यक्त केला होता. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, गौरीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते. या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.अनंत गर्जे यांचे प्रेमसंबंधाची चर्चा असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
गौरीच्या कुटुंबियांकडून हत्येचा आरोप
गौरी गर्जेच्या माहेरच्यांकडून अनंत गर्जे यांच्यावर मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. मुंबईतील वरळी येथील पोलीस स्टेशनमध्ये कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबियांकडून न्याय देण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाचा कसून तपास केला जात असून पोलिसांच्या चौकशीनंतरच या आरोपात कितपत तथ्य आहे? हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून अनंत गर्जे यांच्या परिचितांचे जबाब नोंदवले जात आहेत.
https://www.facebook.com/share/p/1AEtcTcAMe
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




