Saturday, July 27, 2024
Homeनगरवाळू धोरणाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय - ना. विखे

वाळू धोरणाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय – ना. विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

वाळू माफीयांवरील कारवाई ही कोणाला दडपशाही वाटत असेल तर मला त्याची फिकीर नाही. माफीयांच्या तावडीतून प्रवरा माई मुक्त केली याचे समाधान मला आहे. या वाळूच्या विरोधात आदरणीय खासदार साहेबांनी सुध्दा मोठा संघर्ष केला. त्याच विचाराने आपण या अवैध वाळू तस्करीला लगाम घातला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. वाळू धोरणाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याची ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 14 कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देऊन महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दुटप्पी भूमिकांचा समाचार घेतला.

निवृत्त पोलीस अधिकारी हरिभाऊ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख, बापूसाहेब गुळवे, अशोकराव म्हसे, भगवानराव इलग, रोहिणीताई निघुते, सरपंच सौ. प्रिती गोकुळ दिघे, दिलीप शिंदे, शरद थोरात, अरुण थोरात, दिलीप इंगळे, शिवाजीराव कोल्हे, गुलाबराव सांगळे, गोकुळ दिघे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात साडेचार हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून, संगमनेर तालुक्यात 861 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या असल्याचे सांगून भविष्याचा विचार करून प्रधानमंत्री योजनांची अंमलबजावणी करतात. जल जीवन मिशन हे ग्रामीण भागासाठी टाकलेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील 8 महिन्यांत सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आतापर्यंत 12 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली असून, सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना कांद्याच्या प्रश्नाबाबतही राज्य सरकार गंभीर आहे. पणनच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी बोलून अन्यही उपाययोजना करण्याची तयारी ठेवली असल्याचे विखे पाटील म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कांदा प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, यांना शेतकर्‍यांप्रती कोणतेही घेणेदेणे नाही. सत्ता गेल्याने आघाडीचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते तेव्हा यांना शेतकर्‍यांची आठवण झाली नाही. कोव्हीड संकटात यांच्या सरकारने बाजार समित्या बंद ठेवल्याने शेतकर्‍यांना आपला माल रस्त्यावर फेकून द्यावा लागला याची आठवण आंदोलन करणार्‍यांनी ठेवावी. तुमची आंदोलनं ही शेतकर्‍यांसाठी नाही तर सत्ता गेल्याचे दुःख दाखविण्यासाठी आहेत, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा जगात उंचावली आहे. जी-20 परीषदेचे अध्यक्षपद भारताकडे येणे हा अभिमान आहे. कोव्हीड संकटात उपाययोजना करून हा देश मोदींनी सावरला. आज विविध योजनांमधून सामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे काम होत असल्याने देशात भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढत असून कसबा निवडणुकीच्या एका पराभवाने बदलाचे वारे दिसू लागलेल्यांच्या घराचे वासे फिरू लागले असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वयोवृध्द नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास, आनंदाचा शिधा, अंगणवाडी सेविकांचे मानधन आणि 75 हजार नोकर भरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेला गती देऊन चार हजार मेगावॅट वीज निर्मिती करून शेतकर्‍यांना बारा तास वीज देण्याचे उद्दिष्ट असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

महसूल विभागाने सलोखा योजना सुरू केली असून वर्षानुवर्षे सुरू असलेले जमिनीचे वाद यामधून मिटतील, असा विश्वास व्यक्त करतानाच रोव्हरच्या सहाय्याने मोजणीची प्रक्रीया संपूर्ण राज्यात सुरू केली आहे. नगर जिल्ह्यात तीन महिन्यात सर्व मोजणीची प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना दिल्या असून संगमनेर तालुक्याकरिता आणखी सहा रोव्हर मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोणतीही दहशत नाही, मात्र वाळू माफीया आणि शासनाचा महसूल बुडविणार्‍यांवर केलेली कारवाई कोणाला दहशत वाटत असेल तर त्याची आपण फिकीर करीत नाही. वाळू माफीयांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केल्याचे समाधान मला असून, अनेक वर्षे चाललेला वाळू उपसा थांबवावा म्हणून खासदार साहेबांनी संघर्ष केला. आता वाळू लिलाव बंद करण्यात आले असून सरकारच आता वाळू विक्री करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खरी दहशत तुमच्या तालुक्यातच – सौ. विखे

काही वर्षांपूर्वी निमोण येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या झालेल्या सभेची आठवण करून देत सौ. विखे पाटील म्हणाल्या, या सभेला मी उपस्थित होते. सुजयचे भाषण चांगले झाले म्हणून उपस्थितांबरोबरच मीही टाळ्या वाजविल्या. परंतु त्याचेही भांडवल तालुक्यातील नेत्यांनी केले. मुलाच्या कौतुकासाठी टाळया वाजविणे गैर नाही, तुम्ही चांगले काम केले तरी, आम्ही टाळ्या वाजवू असा टोला लगावून खरी दहशत कोणाची किती आहे हे अध्यक्ष असताना तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य मला खासगीत येऊन सांगत होते. तुमच्या तालुक्यातील गावांमध्ये एखाद्याला पत्ता विचारला तरी, लोकं घाबरतात, आमच्या राहाता तालुक्यात विरोधक असला तरी, त्याला घरापर्यंत नेऊन सोडतील. खरी लोकशाही आमच्याकडे आहे अशा आक्रमक शैलीत त्यांनी निशाणा साधला.

देशातील नऊ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, ज्यांनी गैरकारभार केले त्यांना ईडी आणि अन्य एजन्सींची भीती मनामध्ये असेल, कारवाई करणार्‍या सर्व एजन्सी या स्वतंत्रपणे काम करतात. सरकारचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. सामान्य माणसाच्या मनात याबाबत कुठलीही भीती नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या