Sunday, September 29, 2024
Homeनगरविखे-थोरात आज भरणार राजकीय तोफांमध्ये नवा दारूगोळा!

विखे-थोरात आज भरणार राजकीय तोफांमध्ये नवा दारूगोळा!

आश्वी व गुंजाळवाडीतील घडामोडींवर लक्ष || विधानसभेआधीच वातावरण तापणार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी न सोडणारे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शाब्दीक हल्ल्यांच्या तोफा एकमेकांवर रोखून नवा दारूगोळा उडविण्याची शक्यता आहे. दोघांनी एकमेकांच्या ग्राउंडमध्ये कार्यक्रम व बैठकीचे आयोजन करून विधानसभा निवडणुकीपूर्वी धुराळा उडविण्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने राजकीय घडामोडींना वेग दिला जात आहे. एकमेकांचा अंदाज घेत पुढील रणनितीही आखली जात आहे. संगमनेर आणि राहाता मतदारसंघातील वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. याला कारणीभूत आहे ते विखे-थोरात यांच्यातील पारंपरिक राजकीय द्वंद!

- Advertisement -

2 ऑगस्ट रोजी थोरात गटाने आश्वीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक शाखेच्या उद्घाटनानिमित्त राजकीय मेळावा आयोजित केला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला आश्वी परिसर संगमनेर तालुक्यात आहे. त्यामुळे विखे-थोरात संघर्षाचे पडघम या क्षेत्रात सातत्याने वाजत असतात. यावेळी थोरातांनी आश्वीची जाणीवपूर्वक निवड करून विखेंवर राजकीय भडीमार करण्याची योजना आखल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके व शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार होणार आहे. सध्या खा.लंके विखेंविरूद्ध आक्रमक आहेत. त्यामुळे सत्कार हे निमित्त असून खा.लंकेना शिर्डी मतदारसंघातूनच विखेंवर निशाणा साधण्याची संधी देण्याचे निमित्त म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या जोडीला प्रभावती घोगरे उपस्थित राहतील, याची आवर्जून आठवण थोरातांचे कार्यकर्ते करून देत आहेत.

गुरूवारी सकाळी भाजप नेते डॉ.सुजय विखे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर मतदारसंघाचा पर्याय म्हणून विचार करत असल्याचे संकेत दिले. याची दिवसभर चर्चा सुरू होती. त्यामुळे विखे समर्थकही उत्साहित असतानाच सायंकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी दुपारी 12 वाजता पुण्यातून थेट संगमनेर येथे दाखल होणार, अशी माहिती समोर आली. ना.विखे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील भाजप कार्यकर्ते गुंजाळवाडी येथे आगामी घडामोडींबाबत मंथन करणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित राहतील, असे समजते. त्यामुळे विखे पिता-पुत्रांनी कार्यकर्त्यांशी चर्चेसाठी निवडलेल्या टाईमिंगची चर्चा होत आहे. या बैठकीतून थोरातांविरोधातील राजकीय रणनितीला दिशा दिली जाणार का, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

कार्यकर्ते आग्रह धरणार ?
डॉ.सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने संगमनेर येथील बैठकीत त्यावर काय चर्चा होणार, याची उत्सुकता वाढली आहे. भाजप कार्यकर्ते ना.विखेंकडे त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणार का, याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या