Saturday, November 23, 2024
Homeनगरपालकमंत्री विखे पाटील यांनी साधला जळीतग्रस्त व्यापार्‍यांशी संवाद

पालकमंत्री विखे पाटील यांनी साधला जळीतग्रस्त व्यापार्‍यांशी संवाद

व्यापार्‍यांना तात्पुरते गाळे खुले करून देण्याबाबत बैठक घ्या || तहसीलदारांना आदेश

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा शहरात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकाने जळाल्याच्या घटनास्थळी जाऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी जळीतग्रस्त व्यापार्‍यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधत तहसीलदारांना सोमवारी तातडीने बैठक घेऊन दुकानदारांना नगरपंचायतीच्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात गाळे खुले करून देण्याबाबत मार्ग काढण्याचा आदेश दिला.

- Advertisement -

नेवाशातील दुकान गाळे जळून खाक झाल्याच्या दुर्घटनेत सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केलेला असून महसूल प्रशासनाला पंचनाम्यानुसार मदत करण्याचे आदेश दिले. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून आम्हास उदरनिर्वाह करण्याचे साधन राहिलेले नाही. तरी तलाठी व मंडलाधिकारी यांनी केलेला स्पॉट पंचनामा ग्राह्य धरण्यात यावा व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व आम्हास उदरनिर्वाह करण्यास मदत मिळावी, असे निवेदन नुकसानग्रस्त व्यापारी सचिन बोरुडे, रिजवान सय्यद, महेश शेजूळ, विनायक तंटक, अफरोज पठाण, जालिंदर शेंडे, गणेश व्यवहारे, लक्ष्मण रासने, नरहरी शेजूळ, राजू चांदणे, राम शेजूळ, प्रकाश साळुंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले.

तहसीलदार संजय बिरादार यांना आगीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत माहिती घेऊन जळीत झालेल्या दुकानदारांना शासनाची जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आगीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानदारांचा उघड्यावर पडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी नेवासा नगरपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात व्यापार्‍यांना गाळे खुले करून देण्याबाबत तातडीने सोमवारी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा आदेश यावेळी ना. विखे यांनी दिला. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व्यापारी संकुल उभारण्यासाठी नगररचना विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेऊन व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले.

नगरपंचायत मुख्याधिकारी घटनास्थळी अद्याप आले नाहीत. त्यांच्या या निष्क्रियतेची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या जातील. अग्निशमनसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. याबाबत नगर पंचायत यांनी शासनाकडे मागणी व प्रस्ताव केला की नाही आणि केला असेल तर अनुदानाच्या निकषास नगरपंचायत पात्र आहे की नाही हे तपासून अनुदान दिले जाते.

नवीन गाळ्यांबाबत हायकोर्टाचा स्टे आहे परंतु त्यातून काही मार्ग काढून जळीत झालेल्या दुकान धारकांना यात तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करू,असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा प्रवक्ते नितीन दिनकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लघे, ऋषिकेश शेटे, मनोज पारखे, शहराध्यक्ष रोहित पवार, अ‍ॅड. कारभारी वाखुरे, सुनील वाघ, ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब क्षिरसागर, सचिन देसरडा, डॉ. करण घुले, विष्णूप्रसाद मुरकुटे, राजेंद्र मुथा, प्रताप चिंधे, डॉ. बाळासाहेब कोलते, आदिनाथ पटारे, भाऊसाहेब वाघ सतीश गायके यांच्यासह व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद
सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देत व्यापार्‍यांना 50 हजारांची मदत जाहीर करत सोशल मीडियावर शहरातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत कुणी 2 हजार, 1 हजार, 500 रुपये अशी अंदाजे रविवारी 1 लाख 88 हजार 531 रुपयांची मदत जमा झाली.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षाताई रुपवते व तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी भेट देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या