नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमार्गे नाशिक-डहाणू या नवीन रेल्वे मार्गासाठी (Nashik-Dahanu New Railway Line) अंतिम स्थान सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नाशिक-डहाणू नवीन रेल्वेमार्ग १०० किलोमीटर लांबीचा असून हा मार्ग नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांना जोडण्याचे काम करणार आहे. यामुळे दोन महत्त्वाच्या ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करेल, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही
देशातील धार्मिक स्थळे रेल्वेमार्गाने जोडण्यास रेल्वे मंडळाचे प्राधान्य आहे. त्यानुसार चार धाम, १२ ज्योतिर्लिंगे यांना रेल्वेच्या नकाशात स्थान देण्यासाठी नव्या रेल्वेमार्गांची आखणी करून मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) पाठवण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय रेल्वेंना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील डहाणू रोड ते नाशिक ही दोन शहरे सुरक्षित आणि वेगवान पर्यायाने जोडण्यासाठी मध्य रेल्वेने प्रस्ताव तयार केला आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : ३१ ऑगस्ट २०२४ – तूर्तास तरी हे स्वप्नरंजनच!
डहाणू रोडवरून वाणगाव-त्र्यंबकेश्वर (Wangaon-Trimbakeshwar) या मार्गे नाशिक रेल्वे स्थानकाला जोडण्याचे प्राथमिक नियोजन आहे. प्रकल्पातील १०० किमीच्या स्थान सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यासाठी २.५० कोटींच्या खर्चाची तरतूद देखील करण्यात आली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या नाशिकहून डहाणूला जाण्यासाठी गाड्या दक्षिणेकडून कल्याण-भिवंडी-वसई मार्गे किंवा उत्तरेकडील धुळे-नंदुरबार-सुरत मार्गे प्रवास करतात. त्यानंतर आता नवीन रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होण्याची अपेक्षा आहे.
हे देखील वाचा : “अजित पवारांशी युती म्हणजे असंगाशी संग”; भाजप नेत्याच्या विधानामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या?
दरम्यान, नवीन रेल्वे मार्ग उभारण्यापूर्वी वाहतूक सर्वेक्षण, टोपण सर्वेक्षण, प्राथमिक सर्वेक्षण आणि अंतिम स्थान सर्वेक्षण असे टप्पे पार पडतात. अंतिम स्थान सर्वेक्षणात संभाव्य रेल्वे स्थानक आणि रेल्वेमार्गासाठी अचूक खर्च तयार करण्यात येतो. हा खर्च मंजूर झाल्यानंतर रेल्वेमार्ग उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच हा नवीन रेल्वे मार्ग डेक्कन पठार ते डहाणू येथील वाढवण बंदरापर्यंत (Vadhavan Port) कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल, ज्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आली आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा