शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यातील जुने दहिफळ येथे बुधवारी (दि 21) अल्पवयीन मुलाला एकाने विहिरीत फेकून दिले. त्यात दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आरोपीला, नेवासा तालुक्यातील फत्तेपूर शिवारातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे. 21 मे रोजी दहिफळ ते घोटण रस्त्यावर अमन शेख व तोफिक शेख हे रनिंग करत असताना तेथून सचिन गोरख भारस्कर व पिनू गंगाराम भारस्कर हे पायी चालत होते. यावेळी अमन शेख (वय 10) याचा पाय घसरून तो सचिन भारस्कर (वय 26) याच्या अंगावर पडला.
याचा राग येऊन सचिन भारस्कर याने अमन यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या. विहिरीमध्ये फेकून दिले. यात अमन याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सचिन भारस्कर हा गावातून फरार झाला होता. दरम्यान, याबाबत 22 मे ला बेबी गुलाब शेख (वय 65, रा. जुने दहिफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना, संबंधित आरोपी हा नेवासा मार्गे पुण्याला पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. पळून जात असताना नेवासा तालुक्यातील फत्तेपूर शिवारातून त्यास ताब्यात घेतले. शेवगाव पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत कुसारे, किशोर काळे, श्याम गुंजाळ, अरविंद चव्हाण, राहुल खेडकर, संपत खेडकर, संतोष वाघ, प्रशांत आंधळे, नीलेश म्हस्के तसेच सायबर सेलचे राहुल गुड्डू यांनी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे करत आहेत.