Sunday, June 14, 2026
HomeनगरShirdi : साईबाबा संस्थानमध्ये दक्षिणा मोजण्यावेळी चोरी ?

Shirdi : साईबाबा संस्थानमध्ये दक्षिणा मोजण्यावेळी चोरी ?

कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे चौकशीचे आदेश

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथील साईबाबांच्या दानपेटीत जमा झालेली रक्कम मोजदाद वेळी एका कर्मचार्‍याने चोरी केल्याची खात्रीलायक घटना घडली असून त्या कर्मचार्‍यावर चोरीचा गुन्हा दाखल न करता जुजबी कारवाई करत तात्पुरते निलंबन केले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून करोडो साईभक्त येत असतात. बाबांच्या श्रद्धेपोटी झोळीत भरभरून दान करतात. जमा झालेल्या दानाच्या रक्कमेची आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मोजणी केली जाते. याकामी संस्थानच्या कर्मचार्‍यांचा समावेश असतो. कॅश काऊंटींगच्या स्ट्रॉग रूममध्ये सर्वत्र सिसीटीव्ही फुटेज लावलेले असते.

- Advertisement -

तसेच कर्मचार्‍यांना साधा पोशाख घालून मगच आत प्रवेश दिला जातो. असे असतानाही यातील काही महाभाग येथील सर्व यंत्रणा वेशीवर टांगून बाबांच्या झोळीत हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात याचे मोठं आश्चर्य वाटत आहे. असाच प्रकार मागील आठवड्यात घडल्याची जोरदार चर्चा आहे. एका कर्मचार्‍याने कॅश काउंटींग करतेवेळी 500 रुपयांचा नोटांचा बंडल चोरला असल्याचे निदर्शनास आले. परंतु त्याच्यावर संस्थान प्रशासनाने पोलीस ठाण्यात चोरीचा रितसर गुन्हा न नोंदवता त्यास निलंबित केल्याचे समजते. चोरी करताना तो कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याचे समजते आणि या कर्मचार्‍यासोबत आणखी काही कर्मचारी सुद्धा असल्याची चर्चा आहे. हा चोरीचा प्रकार कधीपासून सुरु आहे याबाबत शहरात छुप्या आवाजात अनेक तर्क वितर्क ऐकावयास मिळत आहे.

मात्र दबावापोटी कोणीही उघड बोलायला तयार नाही. घडलेल्या संतापजनक घटनेनंतर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करत चोरीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळे या कर्मचार्‍याला चोरीच्या गुन्ह्यात तत्काळ माफी दिली गेली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्या कर्मचार्‍यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी वरिष्ठ अधिकार्‍यांशी असभ्य वर्तणूक आणि अर्वाच्च भाषेत बोलल्याची व आदेश झुगारल्याचे कारण पुढे करून त्यास निलंबित करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान प्रकरणातील कर्मचारी कोण? यात कोण कोण सामील आहेत? हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता? या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

हे चोरीचे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे बोलले जाते. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा चोरी त्वरीत उघड झाली होती. मात्र त्या कर्मचार्‍याच्या शिर्डीतील अनेक मोठ्या वजनदार नेत्यांशी संबंध असल्याने संस्थानच्या वरिष्ठ अधिकार्‍यावर दबाव आणला गेल्याने चोरीच्या गुन्हा ऐवजीं वेगळ्या पद्धतीने निलंबन केले. ज्या अधिकार्‍यांनी त्याला पाठीशी घातले त्याला सुद्धा सह आरोपी करावे. ते वजनदार हस्ती कोण? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

कठोर कारवाई करणार- गाडीलकर
आज दिवसभर समाज माध्यमावर फिरत असलेल्या चोरीच्या प्रकरणाबाबत मला माहिती मिळाली. ज्या कर्मचार्‍याला निलंबीत केले त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. याबाबत घडलेल्या घटनेच्या दिवशी तेथे असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले असून सदर चित्रीकरणात सर्व प्रकार पुढे येणार आहे. यात कुणाची गय केली जाणार नसून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात जे सत्य पुढे येईल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....