Monday, January 19, 2026
Homeक्राईमAhilyanagar : भयावह वास्तव! प्रेमसंबंधांच्या आडून अल्पवयीन मुलींचे अपहरण

Ahilyanagar : भयावह वास्तव! प्रेमसंबंधांच्या आडून अल्पवयीन मुलींचे अपहरण

दोन वर्षांत हजाराहून अधिक मुली बेपत्ता || पोलिसांनी 822 शोधल्या, 189 अजूनही बेपत्ता

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ ही केवळ कायदा-सुव्यवस्थेचीच नव्हे, तर समाजाच्या सामूहिक अपयशाची गंभीर जाणीव करून देणारी आहे. उपलब्ध झालेली आकडेवारी पाहता, सन 2024 आणि 2025 या दोन वर्षांत तब्बल एक हजारांहून अधिक अल्पवयीन मुली बेपत्ता किंवा अपहरण झाल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. हे प्रमाण कोणत्याही संवेदनशील समाजासाठी धोक्याची घंटा ठरावी असेच आहे. सन 2024 मध्ये 485 तर सन 2025 मध्ये 526 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले.

- Advertisement -

ही संख्या 2023 च्या तुलनेत सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, अपहरण झालेल्या मुलींमध्ये 14 ते 17.5 वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक आहे. यामागे प्रेमसंबंध, सोशल मीडियावरून निर्माण होणारी ओळख, तसेच पालकांचे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे पुढे येत आहेत. पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध पोलिसांकडून घेतला गेल्यानंतर मुलीच्या जबाबातून धक्कादायक बाबी समोर येतात.

YouTube video player

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा अनियंत्रित वापर अल्पवयीन मुलींसाठी धोकादायक ठरत आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरूणांशी किंवा शाळा-महाविद्यालयातील परिचितांशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर अनेक मुली आई-वडिलांचा सल्ला, भविष्यातील करिअर किंवा कायदेशीर मर्यादा यांचा विचार न करता भावनिक निर्णय घेताना दिसतात. प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करून मुलींना पळवून नेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अल्पवयीन असल्याने अशा मुलींना कायदेशीर विवाह करता येत नाही. मात्र घरातून पळून गेल्यानंतर अनेकदा त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे, फसवणूक झाल्याचे प्रकार पोलीस तपासात उघड होत आहेत. पोलिसांकडून मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या जबाबावरून अपहरणासह अत्याचार व पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल होतात.

यातून संबंधित तरूणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असले, तरी याचे भान त्यांना राहत नाही. जिल्हा पोलीस प्रशासनाने आतापर्यंत 822 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत अजूनही 189 मुली बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या आकडेवारीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलगी सुरक्षित आहे का? हा प्रश्न अनेक कुटुंबांना सतावत आहे. पोलिसांकडून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात आहे. याशिवाय, कौटुंबिक वादातून आई किंवा वडिलांसोबत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनाही चिंताजनक आहेत. सन 2024 मध्ये 80 तर सन 2025 मध्ये 153 अशा एकूण 218 मुली पालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यातील 184 मुलींचा शोध लागला असला, तरी अजूनही 49 मुली बेपत्ता आहेत.

मात्र, अल्पवयीन मुलींचे अपहरण होत आहे, त्या बेपत्ता होत आहे यासाठी केवळ पोलिसांच्या प्रयत्नांवर अवलंबून राहून ही समस्या सुटणार नाही. पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे, सोशल मीडियावरील हालचालींकडे लक्ष ठेवणे आणि शाळा-महाविद्यालयांनी समुपदेशनावर भर देणे आज काळाची गरज आहे. समाजानेही या विषयाकडे गांभीर्याने पाहत सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलींचे सुरक्षित बालपण जपणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक कर्तव्य आहे. अन्यथा वाढती आकडेवारी केवळ कागदावर न राहता, अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर कायमची जखम करून जाईल, हे विसरून चालणार नाही.

875 महिलांचा शोध लागेना
केवळ अल्पवयीनच नव्हे, तर प्रौढ महिलांमध्येही बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. गेल्या दोन वर्षांत चार हजार 289 महिला बेपत्ता झाल्याची नोंद असून त्यापैकी तीन हजार 414 महिलांचा शोध पोलिसांनी लावला आहे. मात्र अजूनही 875 महिला बेपत्ता आहेत. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ, कौटुंबिक कलह ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

‘ऑपरेशन शोध’चा गौरव
मुले-मुलींचे अपहरण, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेली ‘ऑपरेशन शोध’ मोहीम उल्लेखनीय ठरली आहे. 1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान राबविलेल्या या मोहिमेत 96 अल्पवयीन आणि 207 प्रौढ व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. ही कामगिरी महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरल्याने अहिल्यानगर पोलीस दलास अपर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखा) यांनी प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी झाली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

ताज्या बातम्या

Crime News : कोठेवाडी खूनप्रकरणातील आरोपीचा पुन्हा गुन्हेगारीकडे कल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यात गाजलेल्या कोठेवाडी खुन प्रकरणातील शिक्षा भोगून बाहेर आलेल्या आरोपीने पुन्हा गुन्हेगारीकडे वळत इतर साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी व घरफोडीचे तब्बल 12...