Monday, July 22, 2024
Homeनगरअल्पवयीनवर अत्याचार, आरोपीस 20 वर्षे सक्त मजुरी व दंड

अल्पवयीनवर अत्याचार, आरोपीस 20 वर्षे सक्त मजुरी व दंड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पिडीत अल्पवयीन मुलगी हिचा आरोपी निलेश झेंडे (वय 22), रा. गेवराई रोड, शेवगाव याने विनयभंग केल्याप्रकरणी नगरच्या अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी पी. आर. देशमुख यांनी भादंवि कलम 376 व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलमनुसार दोषी धरून 20 वर्षे सक्त मजुरी व दहा हजारांचा दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

या प्रकरणाची हकीगत अशी, फिर्यादी यांची अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावी वर्गात शिक्षण घेत होती. 3 एप्रिल 2022 रोजी पीडितेचा दहावीचा शेवटचा पेपर होता. फिर्यादी हे संध्याकाळी जेवण करून झोपलेले असताना, त्यांची पीडित मुलगी ही रात्री ज्या ठिकाणी झोपली होती, त्याठिकाणी ती मिळून आली नाही, म्हणून त्यांनी तिचा घरात व आजुबाजूला शोध घेतला. परंतु ती त्यांना मिळून आली नसल्याने त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा सुरूवातीस तपास हवालदार वीर यांनी केला. शेवगाव पोलिसांनी पीडित मुलीचा तपास केला असता ती, आरोपी हा पीडित मुलीला घेऊन गणपती माथा वारजे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस व पीडितेचे वडील हे घटनास्थळी पोहचले. तेथे शेवगाव पोलिसांनी वारजे पोलिसांच्या मदतीने पीडित मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलगी यांना घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आले. त्या ठिकाणी आल्यानंतर पीडित मुलीने पोलिसांसमोर घटनेची माहिती सांगून जबाब दिला.

यात आरोपी निलेश झेंडे पीडितेस म्हणाला, तुझे पेपर संपले असून आता आपण पळून जाऊन लग्न करू. त्यानंतर 5 एप्रिल 2022 रोजी आरोपी हा पीडित मुलीस पळवून पुणे येथे घेवून गेला. तिथे एका रूमवर तिच्या गळ्यात हार घालून घरातच लग्न केले. त्यानंतर 22 दिवसांनी पीडितेला घेऊन तो गणपती माथा वारजे येथे राहावयास घेऊन गेला. दोन्ही ठिकाणी राहत असताना, आरोपीने पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना देखील तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध केले. पोलीस पीडितेचा जबाब झाल्यानंतर सदर गुन्ह्यात वाढीव कलम लागल्याने पुढील तपास सहायक निरीक्षक आशिष शेळके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, वयासंदर्भात नगर परिषद शेवगावचे माहितगार इसम व मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना हवालदार विजय गावडे व पैरवी अधिकारी आर. व्ही. बोर्डे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या