राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेतील तीन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी, तालुक्यातील एका आश्रम शाळेत जवळपास 120 विद्यार्थी आहे. 9 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रार्थनेसाठी हजर केले असता, प्रार्थना व जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हजेरी घेतली असता त्यात तीन विद्यार्थी बेपत्ता असल्याचे आढळले. त्यांच्या मुळगावी त्यांच्या पालकांकडे विचारपूस केली. मात्र तेथेही त्यांचा तपास नसल्याने कोणीतरी त्यांना अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, यापैकी दोन विद्यार्थी इयत्ता 10 वीत असून ते 15 ते 16 वर्षे वयाचे आहेत. त्यातील एक नगर परिसरातील तर दुसरा श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील आहे. तसेच तिसरा 14 वर्षाचा विद्यार्थी जालना जिल्ह्यातील असून तो इयत्ता 9 वीत शिकत आहे. पोलीस या बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.