मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात पार पडली. या सभेमध्ये बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली असून, माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांच्या नावावर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी माजी क्रिकेटर आणि विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची जागा घेतली. या निवडीमुळे जम्मू-काश्मीर क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे, कारण मन्हास हे बीसीसीआय अध्यक्ष होणारे त्या प्रदेशातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये असलेल्या बीसीसीआयच्या मुख्यालयात बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेचे सदस्य असलेल्या मिथुन मन्हास यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी या बीसीसीआयच्या मागच्या दोन अध्यक्षांप्रमाणेच मिथुन मन्हास यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे विद्यमान अध्यक्ष आणि भारताचे माजी फिरकीपटू रघुराम भट्ट यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांचा KSCA अध्यक्षपदाचा कार्यकाळ 30 सप्टेंबरला संपत आहे. त्याचप्रमाणे देवजीत सैकिया सचिवपदी कायम राहिले, तर प्रभतेज भाटिया यांची संयुक्त सचिव म्हणून निवड झाली आहे.
मिथुन मन्हास यांची कारकिर्द
मिथुन मन्हास यांचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला असला, तरी त्यांनी दिल्ली संघासाठी सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले. ते मिडल ऑर्डर फलंदाज म्हणून ओळखले जात आणि आवश्यकतेनुसार ऑफ-स्पिन गोलंदाजी करून विकेटही घेत. त्यांनी 1997-98 हंगामात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
४५ वर्षीय मिथुन मन्हास यांनी भलेही टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले नसेल, तरीही त्यांचा घरेलू क्रिकेटमधील विक्रम उल्लेखनीय आहे. त्यांनी १५७ फर्स्ट-क्लास सामन्यांत तब्बल 9714 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २७ शतके आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्येही त्यांनी आपली छाप सोडताना 4126 धावा केल्या आहेत. दिल्ली रणजी संघाचा कर्णधार म्हणून मन्हास यांनी अनेक वर्षे संघाचे नेतृत्व केले आणि अनेकदा कठीण प्रसंगी संघाला विजय मिळवून दिला.
मन्हास यांनी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळ केले. त्यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे त्यांना घरगुती क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले. मात्र, भारतीय राष्ट्रीय संघासाठी त्यांना कधी खेळता आले नाही, कारण त्या काळात मधल्या फळीमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांची भक्कम जागा होती.
आता बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर मन्हास यांच्यावर भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याची मोठी जबाबदारी असेल. येत्या काळात देशांतर्गत क्रिकेटला अधिक मजबूत करण्यासाठी आणि खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




