Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी; आ. खताळांचे जलसपंदा मंत्री विखे पाटलांना पत्र

ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी; आ. खताळांचे जलसपंदा मंत्री विखे पाटलांना पत्र

संगमनेर | तालुका प्रतिनिधी | Sangmner

संगमनेर तालुक्यातील (Sangamnear Taluka) जिरायती भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणामध्ये मागील काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे (Rain) समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. या पावसामुळे धरणातील जलस्तर वाढून आता ओव्हरफ्लोची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने या पाण्याच्या नियोजनासाठी हालचाली सुरू झाल्या असतानाच, या पाण्याचा योग्य वापर करावा, अशी जोरदार मागणी तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.

- Advertisement -

धरणात साठलेले ओव्हरफ्लोचे पाणी निळवंडे प्रकल्पाच्या (Nilwande Project) कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील गावांमध्ये सोडल्यास, तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनांनाही या पाण्याचा फायदा होईल. सध्या खरिपाची पिके जोमात वाढत आहेत; मात्र तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस न झाल्याने ही पिके अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच वेळेवर धरणातील पाणी सोडल्यास शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो.

YouTube video player

या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना पत्र पाठवून तातडीने निळवंडे कालव्याद्वारे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे की, पाणीसाठा असला तरी तो योग्य नियोजनाअभावी जर वाया गेला तर ते मोठे नुकसान ठरेल. त्यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता संबंधित यंत्रणांना सूचना देऊन कार्यवाही हाती घ्यावी, असे त्यांनी आग्रहपूर्वक नमूद केले आहे.

सध्या अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस (Rain) झाला नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात खरिपाची आशा आहे. अशा वेळी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण ही काळाची गरज बनली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मागणीमुळे या विषयाला गती मिळण्याची शक्यता असून, प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या