Friday, May 17, 2024
Homeनगरकोपरगावात जुंपली; काळे म्हणाले, ठोकून काढू कोल्हेंचे उत्तर....

कोपरगावात जुंपली; काळे म्हणाले, ठोकून काढू कोल्हेंचे उत्तर….

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दहीहंडीच्या काल्यानंतर कोपरगावात राजकीय कल्ला सुरू झाला आहे. दहीहंडीच्या स्वागत कमानीवरून राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांच्या वादावरून पडलेल्या ठिणगीनंतर कोपरगाव मतदारसंघातील मातब्बर राजकीय घराणी काळे-कोल्हेंच्या तरूण वारसदारांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने राजकारण तापले आहे.

- Advertisement -

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी ‘नादाला लागाल तर ठोकून काढू’, असा इशारा दिल्यानंतर कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ‘हलक्यात घेवू नका, शिंगावर घेवू’ असा प्रतिइशारा दिला.

काळे-कोल्हे गटाच्या समर्थकांमध्ये दोन दिवसांपूर्वी दहीहंडीच्या स्वागत कमानीवरून वाद झाला. दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. या घटनेचे पडसाद कोपरगावात अद्याप दिसून येत आहेत. कार्यकर्त्यांनंतर आता युवा नेत्यांनी एकमेकांना इशारा दिला आहे. शुक्रवारी दोन्ही गटाचे दहीहंडीचे कार्यक्रम शेजारी-शेजारी झाले. राष्ट्रवादीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात ना.आशुतोष काळे यांनी विरोधी भाजपच्या कोल्हे गटावर टीकास्त्र सोडले. ‘काही लोकांनी कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. मात्र कोणी नादाला लागला तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. सरकार बदलल्यामुळे काही लोकांचा उत्साह वाढला आहे. सरकार बदलले असले तरी आमदार मीच आहे, हे त्यांनी विसरू नये’, असा इशारा ना.काळे यांनी कोल्हे गटाला दिला.

त्यानंतर शंकरराव कोल्हे सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना काळे गटाला प्रतिइशारा दिला. ते म्हणाले, ‘सरकार गेल्यामुळे आमदार वैफल्यग्रस्त आहेत. मतदारसंघात ते अतिशय कमी मतांनी निवडून आले, याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल. अशाच प्रकारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. आता भाजप-सेनेचे सरकार राज्यात आहे. हे जनतेचे सरकार आहे.

तेव्हा हाणामारीच्या गप्पा करू नका. विकासाच्या गप्पा करा. विकासाच्या माध्यमातून उत्तर देवू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला असल्याने आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. पण आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आम्हाला हलक्यात घेवू नये, असे कोल्हे म्हणाले. दरम्यान, काळे-कोल्हे गटातील राजकीय संघर्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोपरगाव पालिका निवडणुकांच्या तोंडावर तीव्र होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या