Friday, May 3, 2024
Homeनगरसमुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळवा

समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळवा

आमदार आशुतोष काळे यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना गोदावरी कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी बारमाही पाणी मिळत होते. बारमाही पाणी मिळत असल्यामुळे लँड सीलिंग कायद्यान्वये बारमाही बागायती जमिनी गृहीत धरून शेतकर्‍यांच्या जास्तीच्या जमिनी काढून घेण्यात आल्या. त्यानंतर ब्लॉकधारक शेतकर्‍यांचे 50 टक्के ब्लॉक्स देखील रद्द करण्यात आले व आता समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यान्वये गोदावरी कालव्यांच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नाही.

- Advertisement -

त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे पाण्याच्या बाबतीत नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण झालेला आहे. त्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेला अरबी समुद्राला वाहून जाणारे जवळपास 80 टीएमसी पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी निधी देऊन कायमस्वरूपी नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद मिटवावा, अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली.

अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांना गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी दिले जाते. या कालव्यांना 107 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे या कालव्यांची वहनक्षमता कमी झालेली आहे त्यामुळे सिंचनासाठी मिळणारे आवर्तनही पूर्ण क्षमतेने मिळत नाही.

मात्र समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचा आधार घेत नगर नाशिकच्या धरणातून पिण्याच्या नावाखाली जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. यामुळे पर्जन्यछायेखालील व कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांचा शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सीलिंग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व आता 50 टक्के ब्लॉक्स रद्द केल्यामुळे दुहेरी अन्याय झाला असल्याचा लाभधारक शेतकर्‍यांच्या मनात असंतोष निर्माण झाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकर्‍यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. आशुतोष काळे यांनी पहिल्याच अधिवेशनात शेती सिंचनाच्या महत्वाच्या पाण्याच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधून घेत निधीची मागणी केली आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये व गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

शासनाच्या 2001 च्या अहवालानुसार पश्चिमेला अरबी समुद्राला वाहून जाणारे जवळपास 80 टीएमसी पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोर्‍यात वळवावे यासाठी माजीं आमदार अशोकराव काळे यांनी 2013 साली उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केलेली होती. या याचिकेचा दिनांक 23 सप्टेबर 2016 रोजी निर्णय होऊन पावसाळ्यात पश्चिमेचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी शासनाने मुदतीत कार्यवाही करून पूर्वेकडील खोर्‍यात वळवा, असा आदेश उच्च न्यायालयाने 2016 ला विद्यमान शासनाला केलेला आहे.

त्यावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी सभागृहात मांडलेल्या या विषयाला महत्व प्राप्त झाले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन सोमवार पासून सुरु झाले असून अधिवेशन सुरु झाल्यापासून आ. आशुतोष काळे यांनी विविध खात्यांच्या मंत्र्यांना भेटून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केलेली आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या