कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात बुधवारी बिबट्याने ऊस तोडणी करणार्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवी रक्ताला चटावलेल्या त्या नरभक्ष्यक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे म्हणाले, शेतकर्यांच्या पशुधनावर हल्ला करणार्या बिबट्याने टाकळी परिसरातील केलेल्या हल्ल्यात काही नागरिकांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन बिबट्याचा हल्ला परतावून लावत काही लहान मुले व नागरिक थोडक्यात बचावले होते. परंतु बुधवारी बिबट्याने रात्री आठच्या सुमारास टाकळी रोडवरील कोपरे वस्ती देवकर प्लॉटजवळ चरावर राहणार्या ऊस तोडणी कामगाराच्या चार वर्षाच्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यात वन विभागाच्या अधिकार्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे अशा घटना घडल्यानंतर वेळेवर मदत उपलब्ध होत नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व नागरिकांवर वाढलेले हल्ले रोखण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्यांची व पिंजर्यांची संख्या वाढवावी. तसेच मयत चिमुकलीच्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकाचा जीव गमावल्याच्या घटनेनंतर ज्या प्रकारच्या उपाययोजना करून त्या परिसरातील बिबटे जेरबंद करण्यात आले होते
आणि नरभक्ष्यक बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आला होता, त्याच धर्तीवर कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसराप्रमाणे बिबट्यांचे वास्तव्याच्या ठिकाणी पिंजरे बसवून जेरबंद केलेले बिबटे दूरच्या अभयारण्यात सोडण्यात यावेत, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.




