Monday, May 27, 2024
Homeनगरआ. काळे म्हणाले कोपरगाव राष्ट्रवादीकडेच, कोल्हेंनी काय करावे....

आ. काळे म्हणाले कोपरगाव राष्ट्रवादीकडेच, कोल्हेंनी काय करावे….

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यमान सदस्यांनाच तिकीट मिळणार असल्याने कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. भाजपला येथे जागा नाही. त्यामुळे माजी आमदार कोल्हे यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी मित्रपक्ष झाले आहेत. कोपरगाव मतदार संघात आशुतोष काळे राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आ. स्नेहलता कोल्हे भाजपात आहेत. त्यामुळे कोपरगावची जागा कुणाला यावरून मतदार संघात रणकंदन सुरू आहे.

याविषयी आ. आशुतोष काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, परदेशात असताना अजित दादांचा फोन आला होता. कुठे आहे? विचारलं, मी त्यांना परदेशात असल्याचे सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे, एवढेच त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर राज्यातील घडामोडी समजल्या. परदेशातून आल्यानंतर अजितदादांना भेटलो. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली. विद्यमान आमदारांना तिकीट राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार संघातील सर्वच विकास कामे मार्गी लागतील, असे आश्वासन दादांनी दिले. महाविकास आघाडीच्या काळातही दादांनी मदत केली होती. त्यामुळे अजित दादांना पाठिंबा देऊन मतदारसंघात आलो.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचे ठरले. त्यामुळे सध्यातरी कोपरगाव मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमिवर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. या भेटीत पवारांनी कोल्हेंशी सकारात्मक चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे झाले तर कोपरगावात काळे – कोल्हेंच्या रुपाने पवार काका पुतण्यांचा सामना पहावयास मिळेल.

अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवार साहेबांना भेटलो. साहेबांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला यावेळी पवार साहेबांनी दिला. काळे आणि पवार कुटुंबियांचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. आजोबा स्व. शंकरराव काळे हे पवार साहेब मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पवार कुटुंब एकत्रच आहे, वैचारिकदृष्ट्या दोन वेगळ्या भूमिका आहेत. भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस एक परिवार म्हणूनच समोर येईल, याची मला खात्री वाटते. पवार साहेबांना मानणारे आम्ही कार्यकर्ते असून वैचारिकदृष्ट्या त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

आ. आशुतोष काळे

- Advertisment -

ताज्या बातम्या