Saturday, July 27, 2024
Homeनगरभंडारा जर पवित्र... तर मारहाण का ?

भंडारा जर पवित्र… तर मारहाण का ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भंडारा जर पवित्र आहे, त्यातून आशिर्वादच मिळत असतील तर धनगर आरक्षणासाठी तो उधळणार्‍या कार्यकर्त्यांना मारहाण का? असा सवाल करत, आरक्षणासंदर्भात दिले गेलेले आश्वासन पाळले न गेल्याने धनगर समाजात सरकार विरोधात राग आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आणि मराठा समाजात संवाद आवश्यक असून मुख्यमंत्री यांनी राजस्थानऐवजी तिकडे (जालन्याला) जाणे गरजेचे होते. आरक्षणाच्या मुद्यावर सरकार विरोधात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

- Advertisement -

नगरमध्ये जनसंवाद यात्रेच्यानिमित्ताने आयोजित फेरीत आ. थोरात बोलत होते. यावेळी पुण्याचे आ. रवींद्र धांगेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आ. थोरात म्हणाले, सरकार आणि जनतेत संवाद महत्त्वाचा आहे. लोकांना चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले पाहिजे. खोटी आश्वासने द्यायला नकोत. आज धनगर समाजात सरकारबद्दल राग आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकीत पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, तसे झाले नाही. यामुळे फसवले गेल्याची भावना समाजात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महसूल मंत्री यांच्यावर भंडारा उधळण्यात आला. मंत्री महोदय भंडार्‍याला पवित्र मानत असतील, त्याला आर्शिवाद म्हणत असतील तर तो उधळणार्‍या कार्यकर्त्यांना मारहाण का?, मारहाण होत असतांना मंत्री शांत का होते, असा सवाल आ. थोरात यांनी केला. तसेच सरकार आणि समाजात संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री यांनी संवाद साधणे आवश्यक आहे. राज्यात आज दोन उपमुख्यमंत्री असून त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणे गरजे आहे. राजस्थानला जाण्याऐवजी त्यांनी जालन्यांतील आंदोलनाकाडे जाणे गरजेचे होते. सरकारकडून ज्या पध्दतीने आश्वासन दिले जातात, त्याची पुर्तता होणे आवश्यक आहे. सध्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्याने नाराजी आहे. ज्या प्रमाणे बोलतो, त्या प्रमाणे कृती आवश्यक आहे. अशोक चव्हाण मराठा आरक्षण अध्यक्ष असतांना चांगल्या पध्दतीने आरक्षणासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणावर साधी बैठक घेतली नसल्याचे आ. थोरात यांनी स्पष्ट केले. यामुळे सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यवर काय पाठपुरावा करणार असे आ. थोरात म्हणाले. प्रश्न वेळी न सोडवल्यास आणखी प्रश्न निर्माण होतात, अशी टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे

भाजप सरकारच्या हाती केंद्रात सत्ता आहे. लवकरच लोकसभेचे अधिवेशन होत असून त्यात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करून 50 टक्क्यांच्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीला सत्ताधारी भाजप घाबरलेले असून येणार्‍या निवडणुकीत इंडियाचा विजय निश्चित आहे. जी-20 बैठकांप्रमाणे यापूर्वी देखील देशात आंतराष्ट्रीय बैठका झालेल्या आहेत. त्यापूर्वी मीडियात त्यांचा गाजावाजा होत नव्हता. आंतरराष्ट्रीय बैठकांच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्तापित व्हावी, अशी अपेक्षा आ. थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

….तर मोठा स्फोट होणार

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. सरकारला जाग आणण्याचे काम मनोज जरांगे करत आहेत. मात्र, हे सरकार आरक्षण काही देत नाही. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केवळ आश्वासने दिली. ते सत्तेवर देखील आले मात्र त्यांना आजवर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता आला नाही. मात्र लवकरात लवकर जर समाजाला आरक्षण दिले नाही, तर मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आ. रवींद्र धंगेकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या