तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
दोन वर्ष होत आले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या निवडणुकाही लांबणीवर टाकण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न चुकीचा आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका कार्यक्रमानिमित्त आमदार थोरात बोलत होते. याप्रसंगी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सध्याच्या सरकारने राज्याच्या तिजोरीत खडखडाट करून टाकला आहे. श्रावणबाळ योजनेला देण्यासाठी पैसे नाहीत. अनेक योजनांचे पैसे शासन देत नाही.
राज्यातील सरकारला बहीण नव्हे, सत्ता लाडकी आहे. शासनाच्या पैशांतून प्रचार करण्यासाठी निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. कितीही मोठा नेता असला तरी त्याला मते मागण्यासाठी झोपडीपर्यंत यावे लागते. संविधान आणि लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. लोकशाही आणि संविधान नसेल तर काय होईल, याचा विचार आता प्रत्येकाने करणे गरजेचे बनले आहे.
ते म्हणाले, निळवंडे धरण आणि कालव्यांसाठी आपण कष्ट घेतले, मात्र श्रेय घेण्याचा काहींचा प्रयत्न सुरु आहे. आपण पुनर्वसन करून निळवंडे पूर्ण केले. आता कालव्यांना पाणी येणार आहे. मात्र हे काम आपण केले हे विसरून चालणार नाही. निळवंडेच्या पाण्यापासून वंचित राहणार्या भागाला पाणी देण्याचे नियोजन केले जाईल. मात्र आपल्याला काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी ग्रामस्थांतर्फे आमदार बाळासाहेब थोरातांचा सत्कार करण्यात आला.