राहाता |प्रतिनिधी| Rahata
धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा अपमान होत असताना त्यावेळी जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहात. मागील अडीच वर्षात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. गोरगरीब आणि मजुरांच्या अन्नात माती कालवली. तालुक्याला त्रास देणार्यांना माफी नाही, असा इशारा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला.
आमदार थोरात म्हणाले, मागील अडीच वर्षांपासून आपल्या तालुक्यात सत्ताधार्यांनी अनेकांना त्रास दिला. तालुक्यातील विविध नागरिकांवर खोट्या केसेस टाकल्या. तालुक्यात सुमारे एक हजार कोटींचे दंड झाले. खडीकरण, विकास कामे बंद करून अनेक मजूर व गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचे काम त्यांनी केले. अनेकांना त्रास दिला, आता त्रास देणार्यांना माफी मिळणार नाही.
राज्यातील वाळूचे धोरण पूर्णपणे फसले आहे. वाळू माफिया मोठे केले गेले आहेत. राहात्यात इतकी दहशत आहे की कोणी विरोधी बोलले की तंगड्या मोडल्या जातात. तीच लोक इकडे येऊन भाषण करत आहेत. महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये केली. त्यामुळे संगमनेर तालुका पेटून उठला. जिच्यावर अन्याय झाला तिच्यावरच गुन्हे दाखल झाले. ज्यांनी गुन्हे केले नाही जे भांडण मिटवायला गेले, त्यांच्यावर आठ मिनिटांत मोठे गुन्हे दाखल केले, ही कुठली पद्धत आहे. प्रशासनाने असे वागायला नको.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, चालू असलेल्या संस्था बंद कशा करायच्या हे प्रवरेचे मॉडेल आहे. त्यांना पराभव पचवता आला नाही. काम आले की गोड बोलतात आणि नंतर कृतघ्न होतात अशी तुमची प्रवृत्ती आहे. धांदरफळची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून जे मिटवायला गेले त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस टाकल्या. एकही पेशंट कुठे नाही हा प्रशासनाचा कोणता कारभार आहे, असा सवाल त्यांनी केला.