अकोले |प्रतिनिधी| Akole
आमदाराने आपल्या श्रीमुखात वाजवल्याची तक्रार लिंगदेव येथील एका शेतकर्याने केली आहे. याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटली असून आमदार जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना गावात येऊ न देण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे. संबंधित शेतकरी आणि लिंगदेव ग्रामस्थांच्या प्रतिक्रियांचा व्हिडीओ समाज माध्यमात पसरताच तालुक्यात खळबळ उडाली आहे. आमदारांच्या या वर्तनाचा समाज माध्यमातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. तर या घटनेमागे राजकारण आणि विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार समर्थकांनी केला आहे.
लिंगदेव (ता.अकोले) येथे वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन 15 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार डॉ. किरण लहामटे आले होते. हा कार्यक्रम संपल्यावर गावातील वाळीबा होलगीर या शेतकर्याने आमदार लहामटे यांच्याकडे विजेच्या संदर्भात समस्या मांडली. याचा राग अनावर झाल्याने आमदारांनी होलगीर यांच्या थेट श्रीमुखात लगावली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ देवराम फापाळे यांनी आमदार साहेब तुम्ही हे फार चुकीचे केले असे म्हणताच आमदार लहामटे हे त्यांच्या गाडीत बसून गावातून निघून गेले. त्यानंतर गावातील पक्षाच्या एका तालुकास्तरीय पदाधिकार्याने ग्रामस्थांना उद्देशून काही वल्गना केल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर या घटनेचे पडसाद तालुक्यात उमटले.
लिंगदेव ग्रामस्थ व कानडी समाजाच्या नागरिकांनी सोमवारी (दि.17) सकाळी एकत्र येत या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. आम्ही 50 हजार रुपये देतो, पाचवेळा तुमच्या तोंडात मारले तर चालेल का? असा सवाल जालिंदर कानवडे यांनी उपस्थित केला. सरपंच अमित घोलप, देवराम फापाळे, कानडी समाज संघटनेचे बबन सदगीर, शंकर चोखंडे, बाळासाहेब कानवडे, अशोक कोरडे, संदीप शेणकर आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. रात्री बिबट्याची दहशत तर आता आमदारांची दहशत अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यापूर्वीही आमदार लहामटे यांनी एकाच्या पोटात लाथ मारली, तर दुसर्याचे तोंड सुजविले. तुमची अशी दहशत असेल तर आम्हांला तुमचा विकासही नको असे सांगत आमदारांनी या घटनेबद्दल माफी मागावी, अशी मागणी बाळासाहेब होलगीर यांनी केली. दरम्यान यासंदर्भात अकोले पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.
आदरणीय कै. यशवंतराव सखाराम भांगरे, कै. कॉ. बी. के. देशमुख, कै. मधुकरराव पिचड हे लोकप्रतिनिधीच खर्याअर्थाने वेगळे होते. माजी आमदार वैभव पिचड यांची आमदारकीची कारकीर्दही लक्षणीय, दखलपात्र, संयमी ठरली. मात्र हे आहे घोर कलियुग…!
– डॉ. सुनील शिंदे (ज्येष्ठ साहित्यिक-अकोले)
आमदार पदावरील व्यक्तीने जनताभिमुख असायला हवे, कोणाबद्दल मनात द्वेष नसावा. माजी मंत्री दिवंगत मधुकरराव पिचड यांनी कधीच कुणाचा दुस्वास केला नाही. मात्र, सध्याच्या लोकप्रतिनिधींना आमदार असल्याचा विसर पडलेला असावा. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकर्यांनी आर्थिक मदत दिलेली आहे. पण गरीब शेतकर्यांना हे समजलेच नाही, साहेब आता साधेसुधे राहिलेले नाही तर फॉरच्युर्नर गाडीचा प्रवास करतात. साहेब आता जमिनीवर नसून खूप उंच हवेत भरारी घेत आहेत. असो आता कुठेतरी दिवंगत पिचड साहेबांचे मोठेपण जनता जनार्दनाला दिसून येते आहे.
– रमेश राक्षे (ज्येष्ठ नेते-भाजप)




