कर्जत |प्रतिनिधी| Karjat
शेतजमीन फसवणूक प्रकरणात आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी विरोधात उपोषण करणार्या शेतकरी कुंडलिक जायभाय व अॅड. कृष्णा जायभाय यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने दबाब टाकण्यात येत आहे. प्रकरण न्यायालयात गेलेले आहे. यामुळे आंदोलन करू नये, आंदोलनाच्या वेळी काहीही झाल्यास जबाबदारी तुमची असे पत्र तहसीलदार यांच्यावतीने मंगळवारी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे महसूल प्रशासनाचा दबाब असल्याचा आरोप शेतकरी जायभाय यांच्यावतीने करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलन करणार्या जायभाय यांना प्रवीण घुले, प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र गुंड, काकासाहेब धांडे, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, माणिक जायभाय, अल्ताफ शेख, उद्धव हुलगुंडे, यांच्यासह अनेकांनी समक्ष हजर राहत पाठिंबा दिला आहे. 52 लाखांच्या जमीन प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणी अधिक माहिती देतांना अॅड. कृष्णा जायभाय यांनी सांगितले, कर्जत येथे घर बांधण्यासाठी आ. पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी आणि तिचे प्रतिनिधी सुभाष गुळवे यांनी ऑगस्ट 021 मध्ये वडील कुंडलिक जायभाय यांच्यासोबत व्यवहार केला. यात आम्हाला 52 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, संबंधित धनादेश वटला नाही. यामुळे आमची जमिनी गेली असून पैसेही मिळाले नाही.
याप्रकरणी न्यायालयामध्ये खटला दाखल असून संबंधीत जमिनीवर व्यवहारास न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना देखील आ. रोहित पवार यांच्या नावाचा वापर करून कंपनीचे लोक त्या जमिनीवर कंपाउंड करणे, पीक पाण्याची नोंद, अशा पद्धतीचे काम करत त्रास देत आहेत. तसेच पोलीस व महसूल प्रशासनावर त्यांचा दबाव असून आमची तक्रार दाखल करून घेत नाहीत. यामुळे आमची जमीन आम्हाला परत मिळावी या मागणीसाठी जायभाय उपोषण सुरू आहे असे यावेळी राजेंद्र गुंड, कुंडलिक जायभाय तीव्र नाराजी व्यक्त करत तालुक्यातील जनता जायभाय यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी काकासाहेब धांडे, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, बंडा मोडले, माणिकराव जायभाय यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. दरम्यान, आज दुसर्या दिवशी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार जायभाय कुटुंबाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.