Friday, November 22, 2024
Homeनगरपंतप्रधानांना माफी मागण्याची वेळ येते, हे सरकारचे अपयश- आ. तनपुरे

पंतप्रधानांना माफी मागण्याची वेळ येते, हे सरकारचे अपयश- आ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

छत्रपतींच्या पुतळ्याची अवहेलना झाली. यावरून पंतप्रधानांना माफी मागण्याची वेळ येते. यात राज्य सरकारचे अपयश आहे. परंतु, पंतप्रधानांनी त्वरीत दुसरा विषय काढून त्या माफीत राजकिय हेतू दाखवून दिला हे महाराष्ट्रातील जनतेला रुचले नाही. पुतळा पडला या गोष्टीची खरोखर महाराष्ट्रातील सर्वांनाच वेदना झाली. यामध्ये राजकारणाचा विषय नाही. परंतु, लोकशाही मार्गाने मनातील खदखद वेदना व्यक्त करण्यासाठी लाक्षणिक उपोषण आपण कार्यकर्त्यांसह केले. आज या राज्यकर्त्यांना त्यातही राजकारण सुचत असेल तर यासारखे दुर्दैव नाही, अशी तीव्र भावना माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

31 ऑगस्ट रोजी राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अनेक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आ. तनपुरे यांनी आत्मक्लेष करण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री मालवणला 45 किलोमीटरने वेगाने वारे वाहत असल्याने पुतळा पडल्याची सारवासारव करतात.मात्र मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर ताशी शंभराच्या वर वेगाने वारे वाहून सुद्धा तेथे सामुद्रिक वातावरण असताना छत्रपतींचा पुतळा तसाच उभा आहे हे लक्षात ठेवावे. वास्तविक, ज्या शिल्पकाराला दोन फुटापर्यंतच पुतळा करण्याचा अनुभव असताना त्याला हे छत्रपतींचे मोठे शिल्प करण्याचे काम कोणी दिले? शिल्पकारावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा शिल्पकार निवडणार्‍यांवर काम देणार्‍यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. तनपुरेंनी यावेळी केली.

आज शासन विरोधकांचे आहे. परंतु, आपलेही शासन असते तरीही याबाबत आपली भूमिका अशीच राहिली असती. छत्रपतींच्या पुतळ्याची अवहेलना झाल्याबद्दल आपणही छत्रपतींची या राज्याचा रहिवासी म्हणून, माफी मागतो. यापेक्षा या राज्याचे दुसरे दुर्दैव नाही. परंतु, हा इशारा आता क्रांतीचा आहे. यापुढील काळात छत्रपतींचा खराखुरा विचार जपणारे रयतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे, असे आवाहन केले. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघासह अनेक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त करतानाच उपोषणास पाठिंबा व्यक्त केला. शिवचरित्रकार डॉ.शिवरत्न शेटे व शिवव्याख्याते हसन सय्यद यांची यावेळी व्याख्याने झाली. सायंकाळी पाच वाजता लिंबू पाणी घेऊन आ. तनपुरे व कार्यकर्त्यांनी उपोषणाची सांगता केली.

यावेळी राहाता तालुक्याच्या रणरागिनी प्रतिभाताई घोगरे यांनी सरकारवर कडाडून टीका करीत आ. तनपुरेंच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, किसनराव लोटके, रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, प्रा. सिताराम काकडे, राष्ट्रवादीचे अभिजीत ससाणे, कार्याध्यक्ष भारत तारडे, सुनील अडसुरे, रवींद्र आढाव, रवींद्र बहिरट, नंदराज कुटे, विजयराव डौले आदींनी आपल्या मनोगतातून तीव्र भावना व्यक्त केल्या. उपोषणास बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, किरण कडू, विलास तनपुरे, किसनराव जवरे, नितीन बाफना, दत्तात्रय शेळके, चंद्रकांत पानसंबळ, बाळासाहेब उंंडे, भारत भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, संदीप सोनवणे, प्रकाश भुजाडी, मिलिंद अनाप, राहुल म्हसे, सागर तनपुरे, दिनकर पवार, ताराचंद तनपुरे, महेश उदावंत, राजेंद्र बोरकर, दत्तात्रय कवाणे, नंदू पेरणे आदींसह बाजार समितीचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार संतोष आघाव यांनी मानले.

छत्रपतींचे नाव राहुरी कारखान्याला न देता ते बदलून आजोबांच्या नाव देण्याचा आरोप करणार्‍यांनी तत्कालीन सरकारनेच महापुरुषांची नावे या संस्थांना देऊ नये, असे काढलेले परिपत्रक वाचावे. तत्कालीन संचालक मंडळांनीच तो परिपत्रकाचा आदर करून नाव न देण्याचा ठराव केला होता. त्यातच कारखान्याची डिस्टिलरी असल्याने त्यावरही संबंधित संस्थेचे नाव येत होते. उगाच हवेत गोळ्या उडवून शासनाचे अपयश झाकण्यासाठी साधी माफी न मागणार्‍या निर्लज्ज कार्यकर्त्यांनी इतरांवर आरोप करु नयेत.
– आ. प्राजक्त तनपुरे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या