Thursday, October 31, 2024
Homeनगरमंत्रीपद आणि पक्वान्नाचे ताट नाकारल्याने चौकशा; आ. शंकरराव गडाख यांचा आरोप

मंत्रीपद आणि पक्वान्नाचे ताट नाकारल्याने चौकशा; आ. शंकरराव गडाख यांचा आरोप

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

साखर कारखान्याची इन्कम टॅक्सची नोटीस, मुळा शिक्षण संस्थेची जागा जमा करण्याचा डाव आणि त्यानंतर माझ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका असं मोठं षडयंत्र माझ्या विरोधात लावले गेले असले तरी तुम्ही सारे सोबत असल्याने मी त्यावर मात करील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दरम्यान, महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांच्यासोबत मी जावे यासाठी मंत्रीपदासह पक्वान्नाचे ताट माझ्यापुढे ठेवले. ते मी नाकारले. आता मला खोट्या गुन्ह्यात कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता असली तरी मी आता माझं सर्वस्व तुमच्यासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचा निर्धार आ. गडाख यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे नेवासा मतदारसंघातील उमेदवार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख होते.

मेळाव्याला माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील अबालवृद्धांसह माता- भगिनी आणि विशेषत: तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी आ. गडाख म्हणाले, बांद्रा पोलीस ठाण्यात माझ्यासह प्रशांतभाऊ, गडाख साहेब यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याची याचिका दाखल केली गेली. मागील वर्षात कारखान्याने हिशोब दिला नाही म्हणून पाठवलेल्या दोन पत्राला उत्तर दिले नाही म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस देण्यात आली. प्रत्यक्षात हे पत्रच भेटलेले नाही.
कारखान्याला वेळेत हिशोब दिला नाही म्हणून इनकम टॅक्सची नोटीस दिली गेली. शाळेची जागा सरकार जमा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय आणि शिक्षण बंद करुन ही जागा ताब्यात घेऊन सरकार काय साध्य करणार हे समजले नाही. आरोप-प्रत्यारोप केले जातील आणि मला प्रसंगी अटकही केली जाऊ शकते. थांबण्याचा विचार मनात येत असताना तुमच्या पाठिंब्यावर आणि प्रेमावर मी पुन्हा लढण्याचा निर्णय घेतला.

मुळा-ज्ञानेश्वर हे दोन्ही कारखाने तुमच्या हिताकरिता चालवले जातात. मुळा कारखान्याच्या माध्यामातून शेतकर्‍यांना पुढे नेण्याचे काम केले जाते. कमी खर्चात उत्पादन आणि चोख कारभार, इथेनॉल, सहवीज निर्मिती असे प्रकल्प चालू आहेत. मंत्री झाल्यानंतर सहकारी तत्वावरील इथेनॉल प्रकल्प हाती घेतला. कारखान्याच्या स्वनिधीतून हा प्रकल्प हाती घेतला. दुर्दैवाने उत्पन्न झाले नाही. त्यातून अडचण झाली. राज्यात सर्वात कमी खर्चात उभा राहिलेला एकमेव प्रकल्प! मात्र सरकारची मदत झाली नाही. त्यातून कारखान्यासह अनेक अडचणी आल्या. त्याचा फटका बसला. नियम बाजूला ठेवून बंद पडलेल्या कारखान्यांना मदत केली, कर्ज दिले असताना आम्ही नियमात असताना आपल्याला मदत केली नसल्याचा आरोपही आ. गडाख यांनी केला.

मंत्रीपद, पैसा सारं काही समोर असताना मी त्यांच्यासोबत गेलो नाही. त्याचे परिणाम म्हणून आता या नोटिसांची भानगड मागे लावली असली तरी त्यास आपण भीक घालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, अ‍ॅड. देसाई आबा देशमुख, बहुजन नेते अशोक गायकवाड, अमित रासने, राजेंद्र टेमक, लक्ष्मण बनसोडे , पवार महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सुभाष देव्हढे यांनी केले.

मागच्या विधानसभेला शंकरराव एकटेच होते. अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळेस मी म्हणालो होतो ‘मै हू ना’ आता शंकरराव तुम्ही ठाकरे यांच्या शिवसेनेत आहात. मी व तालुक्यातील जनता तुमच्यासोबत तर आहेच पण या वेळेस ज्येष्ठ नेते पवार साहेब, राहुल गांधी हे सुद्धा तुमच्यासोबत आहेत. त्यमुळे चिंता करू नका मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास असल्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला. 
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या