सोलापूर | Solapur
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हत्याकांडानंतर राजकीय सोलापुरातील वर्तुळातूनही स्थानिक भाजप नेत्यांवर टीका होत आहे. आज मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील सांत्वन करायला आलो आहे असे अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आपल्या सगळ्या राजकारण्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि या गोष्टींचा विचार केला पाहिजे असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियाची सोलापूरात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी संतप्त होत अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी सरवदे कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. परंतु, ज्यावेळी सरवदेंच्या दोन चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर वडिलांसाठी टाहो फोडला, तेव्हा त्यांनाही आपले अश्रू रोखता आले नाही. यावेळी त्यांनी सरवदे कुटुंबीयांना मी तुमच्या पाठिशी असल्याचे म्हटले. अशा निवडणूका जिंकायच्या असतील तर आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो असे उद्वीग्न होत अमित ठाकरे म्हणाले. यावेळी, घडल्या प्रकाराबाबत मत व्यक्त करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे. तसेच, आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असून राज ठाकरे यांच्याही कानावर ही घटना घातल्याचं त्यांनी म्हटले.
महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होते. मात्र, उमेदवारी मागे घेण्यावरुन आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत, मी जसे बघितले तसे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी बघावे, असे म्हणत अमित ठाकरे यांनी सोलापुरातील घटनेवरुन संताप व्यक्त केला. महाराष्ट्राची ही परिस्थिती आणून ठेवलीय तुम्ही, अशा शब्दात संताप व्यक्त केला.
तसेच, कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील सांत्वन करायला आलो आहे. तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवले हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? आपल्या सगळ्यातला माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल.
फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपले राज्य कुठे चालले आहे त्यांनी पाहिले पाहिजे, असेही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले. तसेच, एक आई, दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.




