मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे यांनी बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारपासून ते राज्यातील महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे म्हणत पीएम मोदींपासून ते महायुतीच्या आमदारांच्या भाषणाचे जुने व्हिडीओ जाहीर सभेमध्ये दाखवत सर्वांची पोलखोल केली.
९६ लाख मतदार यादीत घुसवले
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, स्थानिक पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास ९६ लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहे. असे होणार असेल तर कश्यासाठी घेता, कशासाठी मतदार घेता. तुम्ही मतं द्या, नाही तर नका देऊ मॅच फिक्स असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. निवडून आलेले आमदारही आवाक झाले होते. ही कोणती लोकशाही आहे. आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना राग येतो. गल्लीबोळातल्यांना माहिती आहे की सत्ता कशी आली. सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण त्यांनी शेण खाल्लं.’
राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा
राज ठाकरे यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ च्या निवडणूक प्रचारातील भाषण दाखवले. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत सवाल केले होते. राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान पुन्हा ‘लावरे तो व्हिडीओ’ असे म्हणत पीएम मोदींपासून ते महाराष्ट्रातील आमदारांचे जुने व्हिडीओ भरसभेत दाखवले. पीएम मोदींचा व्हिडीओ दाखवत ते म्हणाले की, ‘मी काय वेगळं बोलत आहे. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचे त्यांचे हे भाषण आहे.
आज सार्वजनिक पद्धतीने आसनसोलच्या सभेत निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार करतोय. निवडणूक आयोग जर निष्पक्ष पद्धतीने निवडणूक करू इच्छित असेल तर त्यांना आवाहन आहे की, गुजरातमध्ये शांतते निवडणूक होत असेल तर त्याचे श्रेय निवडणूक आयोगाकडे जात नाही. पण, अशांततेत निवडणूक झाल्यास त्याचे श्रेय निवडणूक आयोगाकडे जाते. निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यांनी नागरिकांचे संरक्षण करावे. बंगाल, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात रिगिंग हिंसाचार होत आहे. पंतप्रधानांपेक्षा अधिक हक्क आहेत. तरीही तुम्ही काय करत आहात, निष्पक्ष निवडणूक घेणे ही आयोगाची जबाबदारी आहे. कोणी नियुक्ती केली हे महत्त्वाचे आहे.
आमदारांचा दाखवला व्हिडीओ
‘त्यांची हिंमत कुठपर्यंत गेली आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की मी निवडणुकीला २० हजार मतदार बाहेरून आणले. पैठणचे आमदार जाहीर भाषणात सांगत होते तेव्हा शिंदेंनी डोळा मारला.’ राज ठाकरे यांनी या आमदार विलास भुमेर यांचा तो व्हिडीओ दाखवत शिंदेसेनेवर टीका केली. ‘महाराष्ट्रातील मतदारांचा आपमान ते जाहीर मंचावरून करत आहेत. हे २० हजार मतदार बाहेर आणले त्यातूनच त्यांची सत्ता आली.’, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. राज ठाकरे यांनी यावेळी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे याचे जुने व्हिडीओ दाखवले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




