मुंबई | Mumbai
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा काल प्रचार थंडावला आहे. उद्या (१५ जानेवारी) रोजी महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होईल. या निवडणुकीत गेल्या काही दिवसांत राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभा, रॅली, बाईक रॅली सह विविध माध्यमातून प्रचाराचा धुराळा उडवला आहे. दरम्यान, मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.
यावेळी मराठी माणूस चुकला तर…
मतदानाआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे, रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो. उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही, असं बाळा नांदगावकरांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठीसाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी ही लढाई किती महत्त्वाची आहे, हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे, असंही बाळा नांदगावकरांनी सांगितले.
https://www.facebook.com/share/p/1hj8eaUnEp
माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता
समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने , ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे. रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्रीनंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे. तुम्हीही पुढे या, असे आवाहन बाळा नांदगावकरांनी केले.





