मुंबई | Mumbai
शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये ठाकरे गटाचा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आता याला मनसेच्या नेत्याकडून उत्तर देण्यात आलं आहे. लबाड लांडगं ढ्वांग करतंय असं म्हणत मनेसे नेत्याने जोरदार टीका केलीय.
‘लोकसभा निवडणुकीत काहींनी मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला’, असी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टिकेवर प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
हे ही वाचा : विधान परिषदेची निवडणूक स्थगित करा; ठाकरे गटाची मागणी
“हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही”, अशा खोचक शब्दांत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
तर मनसेचे नेते राजू पाटील यांनी ही एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “डोक्याला गुंडाळलेले कंबरेचं काढून ‘शर्त’ आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात. तेव्हा काय काढलं होतं ? असा प्रश्न मनसे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावरून विचारला आहे. यासोबत उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्रही शेअर केले आहे. उद्धव ठाकरे यांनीही याआधी पाठिंबा दिल्याची आठवण मनसे नेत्यांनी करून दिली.
उद्धव ठाकरे भाषणात नेमके काय म्हणाले?
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी, “मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की या निवडणुकीत आपण फक्त शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरला. इतर कोणाचाही फोटो लावला नाही. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे कळाले. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला,” असे म्हणत राज ठाकरेंना सूचक शब्दांमध्ये टोला लगावला. “उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट…” असे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा