Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedआधुनिक प्रक्रियेमुळे खाद्यतेल उपलब्धतता ५-६ लाख टनांनी वाढणार-अजय झुनझुनवाला

आधुनिक प्रक्रियेमुळे खाद्यतेल उपलब्धतता ५-६ लाख टनांनी वाढणार-अजय झुनझुनवाला

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

भारतात सरकी ही सर्वाधिक उत्पादन होणारी तेल बी असली तरी त्यावरील प्रक्रिया उद्योग अजूनही पारंपरिक पद्धतीने चालवला जात असल्यामुळे तुलनेने अकार्यक्षम आहे. परंतु, या उद्योगाचे आधुनिकीकरण केल्यास संपूर्ण मूल्यसाखळीमधून चांगल्या दर्जाचे पशुखाद्य आणि अधिक प्रमाणात खाद्यतेलाचे उत्पादन होईल. त्यातून मूल्यवर्धनाबरोबरच देशाची खाद्यतेल आयात कमी करून परकीय चलन वाचवणे देखील शक्य होईल, असे प्रतिपादन खाद्यतेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील शिखर संस्था द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

केंद्र सरकारने चालवलेल्या “तेलबिया मिशन” अंतर्गत २०३० पर्यंत देशातील खाद्यतेल उत्पादन वाढवून एकंदरीत आयात सध्याच्या ६०-६५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकीच्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे मतही श्री. झुनझुनवाला यांनी व्यक्त केले. भारतात गेली काही वर्षे खाद्यतेलाची मागणी भागवण्यासाठी सुमारे ७०टक्के म्हणजे १४०-१५० लाख टन तेल आयात दरवर्षी केले जात आहे. यातून १५ ते १६ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १२५ हजार कोटी रुपये) परकीय चलन खर्च केले जाते. तर देशांतर्गत तेलाचे उत्पादन शंभर लाख टन एवढेच होत आहे.  
 
एसईए आणि दि ऑल इंडिया कॉटनसीड क्रशर्स असोसिएशन (एआयसीओएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या एसईए-एआयसीओएससीए कॉटनसीड ऑईल कॉन्क्लेव्ह- २०२३ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, केंद्रीय अन्न आणि पुरवठा विभागाच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार नंदिता मिश्रा, संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष संजय घोडावत, तिरुमला ऑइल रिफायनरी प्रा.लि.च्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना कुटे, अहमदाबादच्या एन.के. प्रोटीन्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियम पटेल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर येथे ७ व ८ जुलै दरम्यान द फर्न रेसिडेन्सी हॉटेलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

झुनझुनवाला पुढे म्हणाले, खाद्यतेलाचा वापर हे समृद्धीचे प्रतीक आहे. देशाची लोकसंख्या दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढत आहे तर खाद्यतेल वापर तीन टक्क्यांनी वाढत आहे. देशात खाद्यतेलाचा दरडोई वापर सुमारे १७ किलो असून हे प्रमाण शेजारील देशांपेक्षाही कमी आणि विकसित देशांच्या तुलनेत तर खूपच कमी आहे. तरी देखील ही मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी किमान १० लाख टन अतिरिक्त खाद्यतेलाची गरज भासते. त्यामुळे खाद्यतेलाच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासाठी मोहरी, भुईमूग आणि पामचे एकरी उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. याबरोबरच सरकीच्या तेलाचे उत्पादन आणि वापर वाढवण्यावरही भर द्यायला हवा. सरकीवरील प्रक्रिया उद्योग अधिक कार्यक्षम झाल्यास त्यातून दरवर्षी किमान ५ ते ६ लाख टन अधिकचे खाद्यतेल उपलब्ध होऊ शकेल, असेही झुनझुनवाला यांनी नमूद केले. 

सरकीच्या तेलाचे भरपूर फायदे

झुनझुनवाला पुढे म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात जीएम कापूूस बियाण्यांचा पेरणीसाठी वापर होत आहे. जीएममुळे कापसाच्या उत्पादकतेत क्रांती झाली आहे. आता, मानवी वापरासाठी हानिकारक असलेल्या गॉसिपॉलपासून मुक्त असे जीएम सुधारित कापूस बियाणे वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. यामुळे आपल्या देशाची प्रथिनांची गरज भागण्यास मदत होईल. जीएम कापूस बियाणे वापरल्याने तणामध्ये कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गॉसिपॉल असते. परंतु ते सरकी मध्ये उतरत नाही. यामुळे याचे तेल मानवीसेवनासाठी योग्य ठरते. तसेच प्रक्रिया करताना निर्माण होणारे क्रश पोल्ट्री आणि मत्स्य व्यवसायासाठी सर्वात किफायतशीर पशुखाद्य म्हणून वापरता येते.

याप्रसंगी सरकीच्या तेलाबाबत माहितीसोबतच आणि पशुखाद्य म्हणून सरकी-पेंडीचा वापर करून दुग्ध-उत्पादन वाढीबाबत चर्चा करण्यात आली. परिषदेला देशभरातून कापूस बी (सरकी) मूल्यसाखळीशी संबंधित ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात सरकी तेल आणि पेंड निर्माते,  खाद्यतेल रिफायनरी, पॅकर्स, सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स, कापूस जिनर्स आणि विक्रेते, ब्रोकर्स आणि सर्वेअर्स, शासकीय अधिकारी, कृषि शास्त्रज्ञ, सल्लागार आणि मशिनरी निर्माते यांचा सहभाग आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या