Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधमोगरा मौनात गेला

मोगरा मौनात गेला

मोगरा हा शब्द उच्चारताच मन वेडावणारा सुगंध, शुभ्र टपोरे प्रसन्न उमललेले फूल, त्याच्या व्यक्तिमत्वाला संपूर्णत्व प्रदान करणारी देठाची दोन तीन हिरवीगार पाने हे सारे डोळ्यासमोर येते. नुसतेच डोळ्यासमोर येत नाही तर देवाच्या त्या सुगंधित अविष्काराला आपण मनोमन हळूवारपणे ओंजळीत घेत असतो, ऊर भरून त्याच्या सुगंधासकट तो क्षण सुद्धा आत कुठेतरी आपण अनुभवत असतो, साठवत असतो. काही क्षणांसाठी तरी आपण आपलेपण विसरून जात फक्त मनातल्या त्या सुगंधात ओतप्रोत असतो. आणि हे सारे तर फक्त मोगरा हा शब्द केवळ उच्चारताच घडते. पण जेव्हा अशा मोगर्‍याच्या फुलांनी जेव्हा आपली ओंजळ खरीखुरी ओसंडून जाते तेव्हाचा अनुभव? तो तर केवळ शब्दातीत असतो.

माझ्या बागेतले मोगर्‍याचे झाड अचानक एके दिवशी तसे काहीही ठोस कारण नसताना उभ्या उभ्या करपले तेव्हा मला आत खोल खोल जाणवले की हा मोगरा माझ्या बागेचे वैभव होता. जणू काही कार्य संपल्यावर त्याने संजीवन समाधीच घेतली म्हणाना! त्याच्या त्या निष्प्राण, चैतन्य हरवलेल्या स्थितीकडे मी अविश्वासाने कितीतरी काळ बघत बसलो. पुढचे कितीतरी दिवस त्याला कुठे कोंब फुटताहेत का हे शोधत बसायचो. कुणी म्हणाले त्याच्याशी रोज बोल, त्याची परत ये म्हणून प्रार्थना कर, तसेही केले. वाटले हा देवाचा काही खेळ असेल. आपली तो परीक्षा बघत असेल. पण तसे काहीच झाले नाही. तो दिवसेंदिवस वाळतच गेला. अगदी काळवंडून गेला. मग एके दिवशी मी मनाला समजावले आणि तो आता काही परत येणार नाही या सत्याचा स्वीकार केला.

- Advertisement -

जसा मी विचार करण्याच्या मनस्थितीत आलो तसे मला जाणवले की या गेल्या वर्षभरात किंवा अगदीच म्हणायचे झाले तर गेल्या पाचसहा महिन्यांत हा अनेक वेळा बहराला आला. म्हणजे एरवी तो वर्षातून दोन तीन वेळाच बहरायचा. पण यावेळी मात्र पहिला बहर ओसरला की काहीच दिवसांत परत बहराला यायचा. तेव्हा आश्चर्यही वाटले. पण आनंदही व्हायचा. पण त्या वेळीअवेळीच्या बहरण्यातून, निरोप घेण्यापूर्वी त्याला मला काही सांगायचे होते हे माझ्या आत्ता लक्षात येत होते. मी मात्र त्याच्या सुगंधात पूर्ण वेडावलो होतो. बधीर झालो होतो.

शांतपणे, तृप्तपणे, असलेले सारे भरभरून देऊन तो रिक्त झाला. कशातही न अडकता मुक्त झाला. जसजसा त्याच्या असण्याचा आणि त्याच्या जाण्याचा मी विचार करू लागलो तसतसा त्याच्यात मला उपनिषदातला तेजस्वी जीवनवाद जगणारा ऋषी दिसायला लागला. जगात आनंद निर्माण करण्यासाठी अतिशय निस्पृहतेने आपल्यातले उत्तम वाटून टाकणे आणि देण्यासारखे प्रायोजित कर्म संपले की संत ज्ञानेश्वरांसारखे सहजभावाने निघून जाणे म्हणजे तेजस्वी जीवनवाद जगणे. मी त्या मोगर्‍याला मनोमन नमन केले. जणू काही हे त्याला समजले.वार्‍याची हलकीशी झुळूक आली.

आकाशातले ढग जरा जास्त करडे व्याकूळ वाटू लागले. पानांची सळसळ सुरु झाली. एक थेंब माझ्या ओंजळीत पडला व म्हणाला अरे मानवा, तुझ्या अवतीभोवतीचा सारा निसर्गच सतत त्याच्या आविष्कारातून तेजस्वी जीवनवादाच्या ऋचा गातोय. त्याच्या जगण्यातून तुला तो तुझ्या जगण्याचे प्रयोजन सांगतोय. पण मानवा, जरी तू भगवंताची सर्वात सुंदर कलाकृती असलास तरी तुला आता निसर्गाची भाषा समजत नाही. तू खूप दूर जात आहेस रे त्याच्यापासून. हा मोगरा सुद्धा या निसर्गाचाच दूत होता. आपल्या जगण्यातून आपल्या आजूबाजूला अतिशय सहजपणे अभिजात आनंद कसा पसरवायचा हे तुझ्यापर्यंत पोचविण्याची कामगिरी त्याच्यावर होती. पण तू फक्त त्याच्या सुगंधाने वेडावत होतास. पण आपल्या जगण्यातून सुगंध पसरवण्याचे रहस्य मात्र तू शिकायला तयार नव्हतास. तसा विचार सुद्धा तुझ्या मनात येत नव्हता. त्याची ही कैफियत त्याने निसर्गराजाकडे बोलून दाखविली. निसर्गराजाला वाटले कदाचित मोगर्‍याला परत बोलाविले तर त्याच्या वियोगातून तरी तू काही तरी शिकशील. राजाचा होरा खरा ठरला.

आज मोगरा नाही. पण आज त्याचे सारे शहाणपण तुझ्यात उमलत आहे. तू त्याची कविता केलीस. आता जिथे जिथे ही कविता पोचेल तिथे तिथे ती हा मोगर्‍याचा तेजस्वी जीवनवाद पोचवेल. कुठे रुजेल. कुठे नाही रुजणार. पण ऐकणार्‍याच्या मनाचा तळ ढवळून नक्कीच येईल. बस्स, मोगर्‍याची संजीवन समाधी कामी आली. आता तो शांतपणे, समाधानाने आभाळातून तुला आशीर्वाद देत आहे.

पृथ्वीवर जन्माला येणार्‍या किती जणांच्या कर्तृत्वातून असा सुगंध ओसंडून जात असतो? आपल्या आयुष्यात अशी किती व्यक्तिमत्वे आहेत की ज्यांच्या केवळ आठवणीने आपल्यावर आत्मविश्वासाचे मूठभर मांस चढते? आपल्या आयुष्यात अशा किती व्यक्ती आहेत ज्यांच्या सहवासाने काहीतरी छान नवीन करण्याची उमेद येते? किंवा जे काही करत असतो त्यातला आपला उत्साह द्विगुणीत होतो? डोळे आनंदाने चमकतात? ध्येयावरची श्रद्धा दृढ होते? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले स्वत:चे आयुष्य, व्यक्तिमत्त्व असे सुगंधाने भारलेले आहे का? केवळ आपल्या आठवणीने किती जणांचे डोळे आनंदाने चमकतात? आपल्या असण्याने, सहवासाने किती जणांना उर्जा मिळते? मोगर्‍याचे मोगरेपण आम्हाला उमजले का? वर्षानुवर्ष त्याचा सुगंध अनुभवून सुद्धा ते आमच्यात रुजले का?

शंतनु गुणे

मोगरा मौनात गेला

अनंत बहर दिले भोगले

क्षण निरोपाचा आला

मोगरा मौनात गेला

कुणी भरली कुणाची ओंजळ

कुणाच्या मनी कुणाचा दरवळ

अलिप्तेत पहात सारे, रिक्त तो जाहला

मोगरा मौनात गेला

ज्याच्या दारी तो,

तो त्याचे वैभव

संपते आयुष्य,

उरतो तो दरवळ

ज्याचा दरवळ त्याला देऊन

मुक्त तो जाहला

मोगरा मौनात गेला

गुंतणे न दरवळात

हेच मोगर्‍याचे मोगरेपण

देणे संपता सहज निघून जाणे

यालाच म्हणती जगणे जीवन

जगण्याच्या विसर्जनाचा

व्हावा असा सोहळा

मोगरा मौनात गेला!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या