Saturday, July 27, 2024
Homeनगरवेद मंत्रोच्चारात मोहटादेवी गडावर घटस्थापना

वेद मंत्रोच्चारात मोहटादेवी गडावर घटस्थापना

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर देवस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने व वेद मंत्रोच्चाराच्या घोषात देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व त्यांच्या सुविद्य पत्नी नीता गोसावी यांच्याहस्ते घटस्थापना झाली. आई राजा उदो उदो, मोहटा देवी की जय अशा घोषणा, विविध वाद्यांच्या गजराने गडाच्या संपूर्ण परिसरात भाविकांची सर्वत्र मोठी मांदियाळी पसरली होती.

- Advertisement -

आज सकाळी मोहटे गावापासून देवीचे सुवर्ण अलंकार सोन्याच्या मुखवट्याची वाजत गाजत देवीगडापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. रेणुका विद्यालयाचे लेझीम पथक, दांडिया पथकासह विविध पथके मिरवणुकीत सहभागी झाली. अत्यंत राजवैभवात मुखवटा मिरवून गाभार्‍यात आणण्यात आला. उपस्थित हजारो भाविकांनी जय जय कार करत संबळ वाद्यांच्या गजरात देवीचे स्वागत केले. उत्स्फूर्तपणे सर्वांनी दोन्ही हात जोडून पुष्पवृष्टी केली. वेदशास्त्र संपन्न भूषण साकरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर या ब्रह्म वृंदांनी वेदमंत्रोच्चारात पूजा विधी करून घटस्थापना केली. त्यानंतर आरती करण्यात येऊन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

यावेळी पाथर्डीच्या न्यायाधीश अश्विनी बिराजदार, विश्वस्त अ‍ॅड. कल्याण बडे, शशिकांत दहिफळे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अनुराधा केदार, डॉ. श्रीधर देशमुख, श्रीराम परत आदी विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे आदी उपस्थित होते.

घटस्थापनेच्या दिवशीच भाविकांचा व ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्रभर देवी गडाकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ज्योत पेटवून घेणारी मंडळे, पायी चालणारे भाविकांचे गट यामुळे रात्रभर पाथर्डी शहरातही नवरात्रमय वातावरण झाले. यंदा विश्वस्त मंडळाने दर्शन रांगेची सोय अधिक सुलभ केल्याने कितीही गर्दी असली तरी नारळ गेटपासून पायर्‍या चढून भाविक अवघ्या दहा मिनिटांत दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत. गाभार्‍यामध्ये आजची फुलांची सजावट पिंपरी चिंचवडचे नगरसेवक संगीता भोंडवे व उद्योजक राजेंद्र भोंडवे यांच्याकडून सेवा म्हणून करण्यात आली. निवास, भोजन, आरोग्य व पिण्याचे पाणी आदी सुविधा देवस्थान समितीतर्फे देण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक जादा गाड्या पाथर्डीच्या दोन्ही बस स्थानकावरून सोडण्यात येत असून देवस्थान समितीची सुद्धा एक गाडी भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.

सुसज्ज पोलीस यंत्रणा

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 200 पोलीस, होमगार्ड, पोलीस मित्र असा मोठा फौज फाटा तैनात असून सर्वत्र सीसीटीव्हीसह ड्रोन कॅमेरे कार्यरत आहेत. यामुळे कायदासुव्यवस्थेसह चोरट्यांना मोठा आळा बसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या