Thursday, November 14, 2024
Homeनगर‘मोक्का’,‘एमपीडीए’च्या प्रस्तावांना गती द्या

‘मोक्का’,‘एमपीडीए’च्या प्रस्तावांना गती द्या

महानिरीक्षक कराळे यांचे आदेश || जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी काळातील सण-उत्सव, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज कंटकांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करावी. त्यांच्याविरूध्द ‘मोक्का’ व ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाईचे प्रस्ताव तयार करून या प्रस्तावांना गती द्यावी, असे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना दिले आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे दोन दिवसांच्या नगर दौर्‍यावर आले आहेत. गुरूवारी त्यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कलुबर्मे आदी उपस्थित होते. त्यानंतर कराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, यामध्ये काही टोळ्या कार्यरत आहेत. दोन टोळ्या उजेडात आल्या आहेत. अशा टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करता येईल का? याची पडताळणी करून तसे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहन चोरीच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. बैठकीत त्यांनी शेवगावमधील शेअर मार्केट व्यवहारात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचाही आढावा घेतला.

वाहतूक नियंत्रण, अपघात, गर्दीच्या ठिकाणी होणारे गुन्हे याला आळा घालण्यासाठी ‘एक सीसीटीव्ही तुमच्यासाठी-एक सीसीटीव्ही समाजासाठी’ ही मोहीम राबवली जात आहे. व्यावसायिक आपल्या दुकानासाठी सीसीटीव्ही लावतात मात्र त्यांनी आणखी एक सीसीटीव्ही रस्त्यावरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठीही लावावा, यासाठी मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यात सध्या काही शहरांत सीसीटीव्ही बसवले गेले आहेत, मात्र ते नादुरूस्त असतील, वेडे-वाकडे झाले असतील याकडे लक्ष ठेवण्यासाठी दर महिन्याच्या 15 ते 20 तारीखे दरम्यान सीसीटीव्हीचे ऑडिट करण्याची सूचनाही त्यांनी जिल्हा पोलीस दलाला केली.

लंके आंदोलनावर बोलण्यास नकार
खासदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेवर आरोप करत उपोषण केले होते. या आरोपांची व तक्रारीच्या चौकशीचे आदेश नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत देण्यात आले होते. यासंदर्भात बोलण्यास मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी नकार दिला.

गावठी कट्टे, अमली पदार्थ, गोमांस याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी छापेमारी करण्यात येते. मात्र, हा अवैध माल कुठून आला, कुठे जाणार होता त्यामागील साखळी उघडकीस आणण्याचे म्हणावे तसे प्रयत्न पोलीस ठाण्याकडून केले जात नाहीत. मात्र छापेमारी झाल्यानंतर याचा तपास करण्यासाठी व सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडून लक्ष ठेवले जाणार असल्याचेही विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या