पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पुणे महामार्गावरील सुपा टोल नाक्यावर गुरुवारी निवडणूक आयोगाच्या अधिकारी, तपासणी पथक व सुपा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत एका चारचाकी वाहनातून सुमारे 23 कोटी 71 लाख 94 हजार रुपयांचे डायमंड, सोने व चांदी पकडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून हा ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरुन बीव्हीसी लॉजिस्टीक (कुरिअर) कंपनीची बोलेरो व्हॅन ही गाडी (क्रमांक 09 ईएम 9530) सुपा टोल नाक्यावर आली असता, तेथील तपासणी नाक्यावरील अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी गाडीची झाडाझडती घेतली असता, गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी व डायमंड असल्याचे निष्पन्न झाले. ही गाडी पुण्यावरुन अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचे गाडीतील व्यक्तींनी सांगितले. या गाडीत तीन व्यक्ती होत्या. सुरूवातीला त्यांच्या जवळील बिलावरुन गाडीमध्ये चार कोटी 97 लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर निवडणूक अधिकारी, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, आयकर अधिकारी यांनी पंचांसमक्ष पंचनामा करण्यास सुरुवात केली असता, गाडीमध्ये जास्तीचे बिले व सोने आढळून आले. यामुळे पोलीस, आयकर व निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली मोजमापास सुरवात केली असता यात तयार दागिणे, सोन्यांची बिस्किटे, चांदीच्या विटा व डायमंड आढळून आले. गाडीसोबत दाखवलेली बिले व प्रत्यक्ष असलेला माल यात मोठी तफावत आढळून आली.
गुरुवारी रात्री इन कॅमेरा उशीरापर्यत या मुद्देमालाचे मोजमाप चालू होते. यावेळी आप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिक्षक संपत भोसले, सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आव्हाड, पारनेर आचारसंहिता प्रमुख दयानंद पवार, अशोक मरकड, स्थायीपथक प्रमुख माधव गाजरे, वैभव पाचरणे, हवालदार दरेकर, श्रीकृष्ण साळवे, फोटोग्राफर हारदे, आयकर अधिकारी आणि सोने, चांदीचे मोजमाप करणारे अधिकारी उपस्थित होते. निवडणूक आचारसंहितेच्या अनुशंगाने पुणे महामार्गावर सुपा टोल नाका येथे चेकपाँईट सुरू असून तेथे महामार्गावरील वाहनांची तपासणी केली जात आहे.
यामुळे वाहन घेतले ताब्यात
निवडणूक आचारसंहिता काळात सोने आणि पैशाची वाहतूक करणार्या कंपन्यांना वाहतुकीचा मार्ग (रुट) ठरवून दिलेला असतो. तसेच संबंधित वाहनाकडे मार्ग (रुट) परवाना देण्यात आलेला असतो. तसेच संंबंधित वाहनांवर विशिष्ट बारकोड असतो. यामुळे संबंधित वाहनातील सोने आणि चांदी यासह पैसे अधिकृत असल्याचे समजण्यात येते. सुपा टोल नाक्यावर पकडलेल्या चारचाकी वाहनाकडे यातील कोणतीच कागदपत्रे नव्हती. तसेच गाडीला संरक्षण देखील नसल्याने चाणक्ष अधिकार्यांच्या ही बाब लक्षात आली आणि गाडीची तपासणी करण्यात आल्यानंतर कोट्यवधीचे घबाड हाती आले आहे.