दिल्ली । Delhi
यंदाचा नैऋत्य मान्सून वेळेआधीच देशात दाखल होणार असल्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात पोहचला आहे. तसेच तो 13 मे पर्यंत निकोबार बेटांवरही पोहोचेल, असा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात प्रगती करेल. त्यामुळे यंदा मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे. ही स्थिती 2008 नंतर प्रथमच घडतेय.
https://x.com/Hosalikar_KS/status/1921577645843640716
सामान्यतः केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी पोहोचतो. मात्र यंदा 27 मे रोजीच तो दाखल होणार आहे. त्यानंतर मान्सून वेगाने प्रगती करेल. 15 मेनंतर तो दक्षिण अरबी समुद्रात शिरेल आणि श्रीलंकेच्या काही भागांसह संपूर्ण अंदमान बेटांवर प्रभावी होईल.
गोव्यात 5 जून रोजी मान्सून पोहोचेल, तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 6 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात 10 जूनच्या सुमारास पावसाचे आगमन होईल. यापुढे उत्तर भारताकडे त्याची वाटचाल पुढील प्रमाणे होईल:
- 5 जून: गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश किनारपट्टी, पश्चिम बंगाल
6 जून: महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे अंतर्गत भाग
10 जून: मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार
15 जून: गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश
20-30 जून: राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली
हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा देशात 106 टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अल निनो वा ला निनासारखी स्थिती या वर्षी उद्भवणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. गेल्या 20 वर्षांत 2015 वगळता विभागाचा पावसासंबंधीचा अंदाज बऱ्याच अंशी अचूक ठरला आहे. त्यामुळे यंदाही कृषी क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांत पुढील चार दिवसांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदा मान्सून लवकर आणि अधिक प्रमाणात येण्याची चिन्हं असल्याने शेती, जलसंपत्ती आणि सर्वसामान्य जनतेसाठी ही एक सकारात्मक बातमी आहे. मात्र, अचानक होणाऱ्या हवामान बदलांमुळे काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या भागातील पावसाच्या अपडेटसाठी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.