मुंबई । Mumbai
यंदा भारतात मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता असून, येत्या २७ मे रोजी तो केरळात पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) ने वर्तवला आहे. सामान्यतः १ जूनच्या आसपास मान्सून भारतात दाखल होतो, मात्र यावर्षी पाच दिवस आधी मान्सून आगमनाची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळणार असून, शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून वेळेआधी दाखल होण्याची ही गेल्या काही वर्षांतील दुसरी वेळ आहे. याआधी २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यामुळे यंदाचे मान्सून आगमनही ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. सामान्यतः महाराष्ट्रात ७ जून दरम्यान मान्सून पोहोचतो. मात्र, यावर्षी जर मान्सून २७ मे रोजी केरळात पोहोचला, तर महाराष्ट्रातही ४ ते ६ जून दरम्यान मान्सून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना अधिक वेळ मिळू शकतो. यामुळे बियाणं व खते खरेदीसाठी आणि नांगरणीसाठी शेतकऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे.
हवामान विभागाने जून ते सप्टेंबर २०२५ या पावसाळी हंगामासाठी दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यावर्षी देशात सरासरीच्या १०५% पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हवामान मानकांनुसार देशभरात मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चांगल्या पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या वेळेपूर्वी आगमनामुळे आणि अधिक पावसाच्या अंदाजामुळे शेतकरीवर्गात आशा आणि सकारात्मकता निर्माण झाली आहे.